Home रायगड कर्जतमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायदात्यांनी जपली सामाजिक बांधिलकी…!

कर्जतमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायदात्यांनी जपली सामाजिक बांधिलकी…!

130
0

कर्जत – जयेश जाधव

कर्जत तालुका विधीसेवा प्राधिकरण आणि कर्जत वकील संघटनेच्यावतीने बुधवारी कर्जतपासून ३० ते ३५ किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे या आदिवासी पाड्यांपर्यंत जाणारे रस्ते बंद झाले आहेत.

अतिशय दुर्गम भागात राहणार्या या आदिवासी बाधवांना विशेष करून एकट्याने राहणा-या विधवा, ज्येष्ठ महिला यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या परिसरात अद्याप कोणत्याच प्रकारची मदत पोहोचलेली नाही, हे लक्षात घेत वकील संघटनेच्या पदाधिका-यांनी या परिसरात अत्यावश्यक मदत देण्याचे निश्चित केले. माणुसकीच्या नात्याने फुल ना फुलाची पाकळी देण्यासाठी अनेक वकील स्वत:हून पुढे सरसावले. कर्जत वकील संघटनेसोबतच, कर्जत न्यायालयातील कर्मचारीही यात सहभागी झाले.
कर्जत तालुका दिवाणी न्यायाधीश मनोद तोकले यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. योगेश देशमुख, अ‍ॅड. राजेंद्र निगुडकर, अ‍ॅड. प्रवीण खडे, अ‍ॅड. भूपेश पेमारी, अ‍ॅड. योगिनी बाबर यांनी नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतीलदिवाळवाडी येथील आदिवासी वस्ती आणि बलिवरे येथील बौद्धवस्तीतील गरजू, विधवा आणि ज्येष्ठ महिलांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. यात तेल, तिखट मीठापासून डाळ, साखर, साबण आदी जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे. या मदतीसाठी कर्जत वकील संघटनेचे उपाध्यक्ष महेश घारे, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. अजय मेढी, अ‍ॅड. श्री व सौ. चव्हाण, अ‍ॅड. अभिराज शिंदे, अ‍ॅड. नरेश अहिर, अ‍ॅड. सतीश डायरे यांच्यासह सुमारे २८ पदाधिका-यांचे मोलाचे आर्थिक सहकार्य लाभले. कोर्टाच्या आवारात न्यायदानाच्या कामात मदत करणा-यांचे हे दातृत्व आणि माणुसकीचा ओलावा पाहून आदिवासी बांधवांनी मनापासून धन्यवाद दिले. सातत्याने विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय असणा-या कर्जत वकील संघटनेने गरजूंपर्यंत तातडीने केलेल्या या संवेदनशील मदतीसाठी कर्जत आणि परिसरातून कौतुक होत आहे.