Home पश्चिम महाराष्ट्र तिने आपल्या प्रियकरास मारून टाकले

तिने आपल्या प्रियकरास मारून टाकले

62
0

अमीन शाह

पुणे – लग्नाला नकार दिला म्हणून एका महिलेनं कोयत्यानं वार करून प्रियकराचा गळा कापल्याची धक्कादायक घटना कात्रजमधील नऱ्हे भागात घडली आहे. प्रियकराच्या हत्येनंतर आरोपी महिला स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाली. सिंहगड पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज पहाटे साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. महंतेश बिराजदार (वय २७) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर, जयश्री (वय २५ – बदललेलं नाव) असं आरोपी महिलेचं नाव आहे. प्रियकराचा खून केल्यानंतर तिनं स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो फसल्यानं ती पोलीस ठाण्यात हजर झाल्याचं समजतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री ही पहाटेच्या सुमारास रक्ताने माखलेल्या अवस्थेत सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल झाली. तिच्या हातात कोयता होता. ‘मी माझ्या प्रियकराचा खून केला. त्यानं माझी फसवणूक केलीय,’ असं तिनं पोलिसांना सांगितलं. यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.