Home मराठवाडा सिडको बस स्थानकात चालक वाहकात जोरदार हाणामारी

सिडको बस स्थानकात चालक वाहकात जोरदार हाणामारी

172

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. ०६ :- क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर सिडको बसस्थानकात चालक आणि वाहकात फ्री स्टाईल हाणामारी झाली. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या हाणामारीत एसटी महामंडळाचे चार कर्मचारी जखमी झाले आहेत. बसस्थानकातील विश्रामगृहात झालेल्या या फ्री स्टाईल हाणामारीमुळे काही काळ सिडको बसस्थानक परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.
सिडको बसस्थानकात अहमदपूर बस डेपोचे अहमदपुर ते औरंगाबाद बसचे वाहक आमीर जीलानी पटेल (वय ४२) यांनी व सोबतच्या चालकाने बस डेपोमध्ये लावून दोघेही विश्रामगृहात झोपले होते. त्यावेळी विश्रामगृहाबाहेर स्मार्ट सिटी बसचे आणि एसटी महामंडळाचे काही कर्मचारी गोंधळ घालत होते. त्यावेळी आमीर पटेल यांनी त्यांना गोंधळ घालू नका असे सांगितले. त्यावरून चालक-वाहकात वाद झाल्याने गोंधळ घालणा-या आठ ते दहा जणांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी दिग्रस बसडेपोचे चालक रोहीदास जाधव यांनी भांडण करू नका असे म्हणत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना देखील शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या हाणामारीत अहमदपूर डेपोचे आमीर जिलानी पटेल, दिग्रस डेपोचे रोहीदास जाधव व इतर दोघे जखमी झाले आहेत.