
एका संशयीतास अटक ,
हनिफ शेख ,
चिखली तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गांगलगाव येथे आज मंगळवार दिनांक १० मे रोजी एका बांधकाम मजुराचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गांगलगाव येथे एका मंदिराचे बांधकाम सुरू होते. या कामावर गेल्या चार दिवसांपासून आलेल्या एका युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. शिवाजी बोबडे ( अंदाजे वय ३५) असे मृतकाचे नाव सांगण्यात येत आहे. मात्र तो कुठला आहे याबद्दल अजून स्पष्टता नाही.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गांगलगाव येथे एका मंदिराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर चिखली येथील रईस काम करीत होता. ४ दिवसांपूर्वी रईस ने चिखली येथील बस स्थानकावरून एका युवकाला काम देतो असे सांगून गांगलगावला आणले होते. दोघेही चार दिवसांपासून मंदिर परिसरात राहत होते. रईस आधीपासून गावात कामाला असल्याने गावातील एका दुकानात त्याचे उधारीचे खाते होते.
रईस ने सोबत आणलेल्या युवकाला सुद्धा उधारीत पुड्या घेऊन दिल्या होत्या. त्यावेळी त्या युवकाने त्याचे नाव शिवाजी बोबडे असे सांगितले होते. दरम्यान सोमवार दिनांक ९ मे रोजी काम बंद होते. आज,१० मे रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास मंदिरामागच्या शेतात आग लागल्याचे स्थानिकांना दिसले. स्थानिकांनी धाव घेत आग विझवली असता आगीत एका युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या प्रकाराची चर्चा गावात पसरल्यानंतर तो मृतदेह शिवाजी बोबडे नावाच्या युवकाचा असल्याचे समोर आले. दरम्यान हा खून असल्याचा संशय पोलीसांना असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.संशयीत म्हणून पोलीसांनी सध्या रईसला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांत हा दुसरा खून आहे. याआधी असोला फाट्यावर एका ट्रकचालकाचा अज्ञातांनी खून केला होता. त्या प्रकरणाचा उलगडा झालेला नसतांना आणखी एक खून झाल्याने पोलीसां वरील ताण वाढणार आहे.











































