Home पश्चिम महाराष्ट्र माझे महाविद्यालय मला संस्काराचे केंद्र वाटते” – दादासाहेब कचरे

माझे महाविद्यालय मला संस्काराचे केंद्र वाटते” – दादासाहेब कचरे

44
0

मायणी – सतीश डोंगरे

सातारा , दि. १४ :- “जीवनाला योग्य वेळी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महाविद्यालयात घडते. ज्ञानाच्या व संशोधनाच्या अनेक कक्षा महाविद्यालयीन शिक्षणात उलगडत जातात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अज्ञात पैलूंना उजाळा मिळतो. भावी जीवनाला योग्य दिशा लाभते. म्हणूनच आजही माझे महाविद्यालय मला संस्काराचे केंद्र वाटते,” असे प्रतिपादन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दादासाहेब कचरे यांनी केले. ते येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थी व पालक मिळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी होते. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष शशिकांत खैरमोडे, सौ. वृषाली देशमुख, डॉ. उत्तम थोरात, प्रा. रामचंद्र निकम, पालक संघाचे तुषार चव्हाण, सुमित कोळी, अंकुश चव्हाण,
आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. लक्ष्मण जठार यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बार्टीचे खटाव तालुका प्रतिनिधी महेश घाडगे यांनी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांना भारतीय संविधानाची प्रत भेट दिली. तसेच कु. अक्षता लुकडे हिचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. सातारा विभागीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या विशाल माने, दत्तात्रय धोत्रे, इम्रान खान (सर्व बी.ए.भाग १) अकबर शेख (बी.ए.भाग ३) यांचा सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयीन जीवनातच खऱ्या अर्थाने आयुष्याची पायाभरणी झाली, हे स्पष्ट करून दादासाहेब कचरे पुढे म्हणाले, “आजही महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून अनेक विषयांचे मार्गदर्शन लाभते. त्यामुळे गुरुवर्यांना भेटल्यानंतर आमच्यामधील विद्यार्थी जागा होतो. समाजासाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रम भविष्यात आमच्या माजी विद्यार्थी संघाकडून राबविले जातील.”
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी म्हणाले, “शिक्षण आणि शेती या दोन क्षेत्रांना मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी माणसाचे मन व शरीर सुदृढ केले आहे. माजी विद्यार्थी म्हणजे महाविद्यालयाची दौलत आहे. आमचे विद्यार्थी शिक्षण, पत्रकारिता, न्यायपालिका, बँकिंगचे क्षेत्र, प्रशासकीय सेवा अशा विविध ठिकाणी कार्यरत आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो.” यावेळी मयूर यलमर, श्रीरंग पवार, अमर लोखंडे, किरण जाधव, प्रा. शिवप्रसाद देशमुख आदी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन प्रा. सिद्धेश्वर सपकाळ यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. उत्तम टेंबरे यांनी केले.

Unlimited Reseller Hosting