Home कृषि व बाजार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतक-यांप्रति संवेदनशील राहून काम करा –...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतक-यांप्रति संवेदनशील राहून काम करा – जिल्हाधिकारी गुल्हाने

44
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. 10 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा आढावा राज्य शासनाकडून नियमित घेण्यात येत आहे. त्यामुळे वेळेत या योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता बँकेच्या प्रतिनिधींनी शेतक-यांप्रति संवेदशनशील राहून गांभिर्याने कामे करावीत , असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा सहनिबंधक अर्चना माळवे आदी उपस्थित होते.

राज्य शासनाने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतक-यांचे बँक खाते आधारकार्डशी जोडणे अत्यावश्यक आहे. बँकांना या संदर्भात विहित नमुन्यातील याद्या त्वरीत पूर्ण करावयाच्या आहेत. त्यानुसार गांभिर्याने कारवाई करावी. शेतकरी सभासदांचे आधार सिंडींग लवकरात लवकर होईल, यासाठी बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी संबंधित शाखेच्या व्यवस्थापकांना निर्देश द्यावेत. यात कोणतीही हयगय करू नये. वेळेच्या आत सर्व याद्या व आधार सिडींग करण्याला प्राधान्य द्या, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यात 1 लक्ष 41 हजार 496 शेतकरी सभासदांचे बचत खाते पात्र आहेत. यापैकी 1 लक्ष 8 हजार 768 शेतक-यांचे बचत खाते आधार सिडींग झाले आहेत. आधार सिडींग न झालेल्या बचत खात्यांची संख्या 32 हजार 728 आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मधील 45147 बचत खात्यांपैकी 37927 बचत खात्यांचे आधार सिडींग पूर्ण झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 22114 बचत खात्यांपैकी 17812 खात्यांचे आधार सिडींग, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 19312 बचत खात्यांपैकी 15841, बँक ऑफ महाराष्ट्रच्या 10024 बचत खात्यांपैकी 6418 आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या 9667 बचत खात्यांपैकी 5517 खात्यांचे आधार सिडींग पूर्ण झाले आहेत. सर्व बँकांच्या शाखांमार्फत उर्वरीत बचत खात्यांचे आधार सिडींग करण्याचे काम सुरू आहे.