Home बुलडाणा अज्ञात वाहनाच्या धडकेत विवाहिता ठार , ” दोघे जखमी”

अज्ञात वाहनाच्या धडकेत विवाहिता ठार , ” दोघे जखमी”

37
0

दुःखद घटना….

दीपक नागरे

सिंदखेडराजा , दि. ०४ :- अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एका २७ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. ३ जानेवारी, शुक्रवारी सायंकाळी ६ वा. सुमारास किनगावराजा ते दुसरबीड दरम्यान हॉटेल गौरव जवळ घडली.

त्रिवेणी संतोष डोळे, वय २७ वर्षे हिचा विवाह टिटवी, ता. लोणार येथील संतोष डोळे यांच्याशी झालेला आहे. उभयतांना तृप्ती उर्फ राणी वय १२ वर्षाची मुलगी व प्रफुल वय ९ वर्षे मुलगा आहे. विवाहानंतर सासरच्या मंडळींशी वाद असल्याने त्रिवेणीचे सिंदखेडराजा कोर्टात प्रकरण सुरु होते. आज कोर्टाची तारीख असल्याने त्रिवेणी तिचे वडील गुलाबराव चाटे वय ५७ व मुलगी तृप्ती हे माहेर असलेल्या दरेगाव येथून मोटारसायकल (क्र. एम. एच. २८ ए. एम. ९१२१) द्वारे सिंदखेडराजा कोर्टात आले होते. तेथील कामकाज संपल्यानंतर सायंकाळी दरेगाव येथे दुचाकीवरुन परतत असतांना किनगावराजा ते राहेरी दरम्यान असलेल्या हॉटेल गौरव नजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात त्रिवेणी संतोष डोळे ही घटनास्थळीच ठार झाली. तर वडील गुलाबराव चाटे व मुलगी तृप्ती उर्फ राणी हे दोघे जखमी झाले आहेत. दुचाकीला धडक दिल्यानंतर चालकाने अज्ञात वाहन घटनास्थळावरुन घेऊन फरार झाला आहे.
अपघातात जखमी झालेले गुलाबराव चाटे व मुलगी तृप्ती यांच्यावर किनगावराजा येथील डॉ. शिवानंद जायभाये यांच्या दवाखान्यात उपचार करुन पुढील उपचारासाठी जालना येथे रवाना करण्यात आले आहे. तर त्रिवेणी डोळे हिचा मृतदेह सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अजून गुन्हा दाखल झाला नसला तरीही घटनेच्या अनुषंगाने किनगावराजा पोलीस तपास करीत आहेत.

Unlimited Reseller Hosting