Home मराठवाडा दिव्यांगांचे नववर्ष कळसुबाई शिखरावर शिवुर्जा प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

दिव्यांगांचे नववर्ष कळसुबाई शिखरावर शिवुर्जा प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

412

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

औरंगाबाद , दि. 03 :- सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी राज्यभरातील 41 दिव्यांगांच्या टीमने सर्वोच्च कळसुबाई शिखर सर केले आहे.
शिवुर्जा प्रतिष्ठान तर्फे राज्यभरातील दिव्यांगांसाठी कळसुबाई शिखर ऊर्जा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते . या मोहिमेसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या अपंग हक्क विकास मंच तर्फे विशेष सहाय्य करण्यात आले.

शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेचे आठवे वर्ष आहे . शिवुर्जा प्रतिष्ठान ही संस्था राज्यातील दिव्यांगांसाठी वर्षभर गड-किल्ल्यांचे संवर्धन व भटकंती मोहिमांचे आयोजन करणारी संस्था आहे . स्वतः शिवाजी गाडे हे पोलिओग्रस्त अपंग असून त्यांनी आतापर्यंत 115 गड किल्ल्यांची भटकंती व आठ वेळेस कळसुबाई शिखर सर केले आहे . कालच्या ऊर्जा मोहिमेत राज्यभरातून 41 दिव्यांग व मदतनीस सहभागी झाले होते.
33 पुरुष व 8 महिला पैकी अस्थिव्यंग-23 ,अंध-5,गतिमंद-1,बहुविकलांग-1 व सक्षम-11 सदस्यांनी सहभाग घेतला .
31 डिसेंबर रोजी सर्वोच्च शिखरावर सुर्यास्ताला निरोप देताना ,1 जानेवारी नववर्षाचा सूर्योदय पाहून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते . रात्रीचा मुक्काम शिखरावरच केला जातो. परंतु या वर्षी वनविभागाने शिखरावर मुक्काम करण्यास बंदी आणल्याने शिखर वाटेतच अर्ध्या टप्प्यावर तंबूत मुक्काम ठोकण्यात आला . कडाक्याच्या थंडीत व सोसाट्याच्या वार्‍यात भल्या पहाटे अंधारातच दिव्यांगांनी चढाईस सुरुवात केली. पहाटे साडेचार वाजता सुरुवात केल्यानंतर अनेक अवघड चढ-उतार व शिड्या पार करत ठीक साडेसहा वाजता विना अपघात दिव्यांगांनी कळसुबाई शिखर सर केले . शिखर सर करताच सहभागी सर्वच सदस्यांनी घोषणा देत जल्लोष साजरा केला. या ऊर्जा मोहिमेत औरंगाबादचे विजया वाणी, शांताराम बनकर ,संदीप राऊत, सविता उन्हाळे ,राजेंद्र जाधव, रितेश केरे ,दीपक ढोरमारे ,रामेश्वर कोठाळे ,तुकाराम मतसागर. नाशिकचे अंजना प्रधान, चेतन रत्नपारखी,खंडू कोटकर. अहमदनगरचे नवनाथ राऊत, अनिल बिडकर. मुंबईचे वर्षा सिंह, चनक बनसोडे .धुळेचे संजय सोनवणे .जळगावचे विजय पाटील ,संतोष महाजन. सांगलीचे निवास पाटील ,अमर पवार .सोलापूरचे सोमनाथ धुळे. बुलढाणा चे गणेश खरात इत्यादी विविध प्रकार चे दिव्यांग राज्यभरातून सहभागी झाले होते.

या दिव्यांगांना शिखरावरती चढण्या उतरण्यासाठी सहभागी गिर्यारोहक नामदेव बांडे , दुर्गप्रेमी विष्णू ससाने,अनिल राऊत व राजेंद्र केरे सह इतर सक्षम मदतनिसांनी मोलाची मदत केली.