Home कृषि व बाजार शेतक-यांनी स्वत:कडे राखून ठेवलेल्या सोयाबिन बियाणाचा वापर खरीप हंगामासाठी करावा.!

शेतक-यांनी स्वत:कडे राखून ठेवलेल्या सोयाबिन बियाणाचा वापर खरीप हंगामासाठी करावा.!

297

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. 29 :- जिल्हयामध्ये सोयाबिन पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र 1 लाख 7 हजार हेक्टर असुन या पिकाखालील पेरणी क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. खरीप हंगाम 2020 मध्ये सोयाबिन पिकाखालील 1 लाख 39 हजार हेक्टर क्षेत्र अपेक्षित आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी बियाण्याची गरज भागविण्यासाठी विविध स्त्रोताव्दारे बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्या शेतक-याकडे स्वत:कडील बियाणे योग्य पध्दतीने साठवणूक करुन ठेवले आहे अशा शेतक-यांनी स्वत:कडील सोयाबिन बियाणाचा खरीप हंगाम 2020 साठी वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.
स्वउत्पादित सोयाबिन बियाण्याचा पेरणीसाठी वापर करतांना घ्यावयाची काळजी

सोयाबिन हे स्वपरागसिंचित पिक असल्याने या पिकाचे बियाणे सरळ वाणाचे आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासुन उत्पादित होणारे सोयाबिन बियाणे शेतक-यांनी पेरणीसाठी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. व शास्त्रीयदृष्टया असे बियाणे पेरणीसाठी वापरता येते. प्रमाणित बियाण्यापासुन उत्पादित बियाण्यांची चाळणी करुन चांगल्या प्रतिचा बियाण्याची निवड करावी, सोयाबिन बियाण्याचे बाहयवरण नाजुक व पातळ असल्याने त्याची हाताळणी काळजीपुवर्क करावी. साठवणुक केलेल्या सोयाबिन बियाण्यांच्या पोत्यात हाताळणी व वाहतुक काळजीपुर्वक करावी. पोती उंचावरुन आदळली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्या शेतक-यांनी खरीप हंगाम 2019 मध्ये प्रमाणित सोयाबिन बियाणे पेरले होते. अशा शेतक-याकडील उपलब्ध बियाणाची माहिती संकलित करावी व हे बियाणे आजुबाजुच्या शेतक-यांना बियाणे म्हणुन पेरणीसाठी वापर करण्याबाबत प्रवृत्त करावे.
राखुन ठेवलेल्या बियाण्याचा पेरणीसाठी वापर करण्यापुर्वी घ्यावयाची काळजी

पेरणीपुर्वी बियाण्याची उगवण क्षमतेची तपासणी करणे फार गरजेचे असते. चांगल्या उगवण क्षमतेची खात्री पटू शकते. पेरणी करतेवेळी बियाण्याचे प्रमाण किती ठेवावे याबद्दल अंदाजही येऊ शकतो. उगवण क्षमतेची तपासणी घरच्या घरी करता येते. व ही पध्दत अतिशय सोपी आहे.

*उगवण क्षमता कशी तपासावी*.

स्वत:कडे असलेल्या बियाण्याची चाळणी करुन त्यामधील काडीकचरा, खडे लहान खुरटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणीनंतर स्वच्छ एका आकाराचे बियाणे उगवण क्षमता चाचणीसाठी निवडावे. वर्तमानपत्राचा एक कागद घेऊन त्याचा चार घडया पाडाव्यात त्यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पुर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येक दहा बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतरावर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी.
अशा रीतीने 100 बियांच्या 10 गुंडाळया तयार कराव्यात नंतर या गुंडाळया पॉलीथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात जर ती संख्या 60 असेल तर उगवण क्षमता 60 टक्के आहे. असे समाजावे जर ती संख्या 80 टक्के असेल तर 80 टक्के असे समजावे. अशा पध्दतीने घरच्या घरी उगवण क्षमतेचा अंदाज घेता येतो. सोयाबिन बियाणाची उगवण क्षमता चांगली म्हणजे 70 टक्के पेक्षा जास्त असेल तर शिफारस केलेल्या मात्रेनुसार पेरणीसाठी प्रति हेक्टर 75 किलो बियाणे वापरावे.
शेतक-यांनी स्वतकडील बियाणे वापरण्यापुर्वी त्याची उगवणक्षमता तपासून नंतरच बियाण्याची पेरणी करावी. 70 टक्के पेक्षा कमी उगवण क्षमता असल्यास 30 बियाणे प्रति हेक्टर व 60 टक्के उगवण क्षमता असल्यास 35 किलो प्रती हेक्टर बिण्याण्याचा वापर करावा.
रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणी पुर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन असे बियाणे सावलीत वाळवावे. पेरणीपुर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशी रोगांपासून सरंक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. 75 ते 100 मीमी पाऊन झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाणाची पेरणी जमिनीत पुरेशी ओल असतांना आणि 3 ते 4 सेटीमीटर खोली पर्यंत करावी पेरणीसाठी प्रती हेक्टरी दर 70 किलोवरुन 50 ते 55 किलो आणण्यासाठी सोयाबिन बियाणे टोकण पध्दतीने किंवा प्लॅटरच्या सहाय्याने रुंद वरंबा सरी पध्दतीने यंत्राने पेरणी करावी, असे कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.