Home बुलडाणा लॉकडाऊनमुळे शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी

लॉकडाऊनमुळे शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी

227

दीपक नागरे

सिंदखेडराजा:- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सावखेड तेजन येथील एका महिला शेतकऱ्याने घेतलेले भाजीपाल्याचे पीक जागीच सडले आहे. यामध्ये ह्या शेतकरी महिलेचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.
गत पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात भरपूर पाऊस झाल्याने तालुकाभरात यावर्षी सिंचनाची परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे सावखेड तेजन येथील महिला शेतकरी द्वारकाबाई पाटीलबा जायभाये यांनी गट नं. २३२ मध्ये दोन एकर क्षेत्रावर फुलकोबी या भाजीपाला पिकाची लागवड केली. बी बियाणे, लागवड, मशागत, फवारणी आदिंसाठी जायभाये कुटुंबीयांनी शारीरिक मेहनतीसह खर्चही केला. त्याचा परिणाम व निसर्गाची साथ यातून पीकही बहरले. हे भाजीपाला पीक अंतिम काढणीच्या टप्प्यात असतांनाच कोरोना विषाणूच्या साथीने जोर धरला. त्यासाठी लॉकडाऊन केले गेले. त्यामुळे जायभाये कुटुंबियांना फुलकोबी विक्रीसाठी बाजारात नेताच आली नाही. उभ्या उभ्या जागेवरच फुलकोबी सडली गेली.
तलाठी ब्रह्मदेव गणपत साळवे ह्यांनी व पंच योगेश सुभाष जायभाये, सिद्धेश्वर महादेव वाघ व राजेंद्र एकनाथ जायभाये आदिंनी या फुलकोबी भाजीपाला पिकाच्या नुकसानीचा पंचनामा केला असून अहवाल तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांच्याकडे पाठविला आहे.
या प्रातिनिधिक घटनेतून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान प्रकाशात येत असून, त्यांच्याही पिकांचे पंचनामे करीत नुकसान भरपाई देण्यात येण्याची मागणी जोर धरत आहे.