
शिस्तपालनासाठी परिपत्रक काढण्याची मागणी; ऐतिहासिक वास्तू संवर्धन प्रतिष्ठानचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
शेख जाकिर
सिंदखेड राजा : – जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्यावर असताना काही अधिकारी व कर्मचारी पूर्ण अधिकृत वर्दी धारण करत नसल्याच्या तसेच सेवा नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून पुढे येत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत राजे लखुजीराव जाधवराव गड किल्ले ऐतिहासिक वास्तू संवर्धन प्रतिष्ठान यांच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांना निवेदन सादर करून जिल्हाभर कडक परिपत्रक काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रतिष्ठानचे सचिव अतिश राजे जाधव यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पोलीस वर्दी ही केवळ गणवेश नसून ती शासनाच्या अधिकाराचे, कायद्याच्या अंमलबजावणीचे व जनतेच्या सुरक्षिततेचे प्रतीक आहे. वर्दीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना व कायद्याविषयी आदर निर्माण होतो. कर्तव्यावर असताना वर्दी न धारण करणे, नेमप्लेट अथवा ओळखपत्र न लावणे यामुळे पोलीस दलाच्या शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह प्रतिमेला बाधा पोहोचू शकते.
निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत –
कर्तव्यावर असताना सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पूर्ण अधिकृत वर्दी धारण करणे बंधनकारक करावे.
नेमप्लेट, ओळखपत्र व अधिकृत चिन्हांचा वापर अनिवार्य करावा.
शिस्त, वेळेचे पालन व नागरिकांशी नम्र व जबाबदारीपूर्वक वर्तनाबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात.
नियमभंग आढळल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाईची तरतूद अधोरेखित करावी.
सर्व पोलीस ठाण्यांमध्ये नियमित शिस्त व वर्दी तपासणी मोहीम राबवावी.
जिल्हा पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यात उल्लेखनीय कार्य करत असून, प्रशासनाची प्रतिमा अधिक बळकट व्हावी व जनतेचा विश्वास दृढ व्हावा या सकारात्मक हेतूने हे निवेदन देण्यात आल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
या मागणीवर पोलीस प्रशासन काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.













































