Home बुलडाणा पिकविमा नोंदणीसाठी सीएससी केंद्रांकडून शेतकऱ्यांची लूट “शिवसंग्राम चे तहसीलदारांना निवेदन”

पिकविमा नोंदणीसाठी सीएससी केंद्रांकडून शेतकऱ्यांची लूट “शिवसंग्राम चे तहसीलदारांना निवेदन”

110

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा :-राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक रुपया मध्ये शेतकऱ्यांना पिक विमा उतरविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सदर निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून सामूहिक सेवा केंद्र चालक (CSC) 1/- रुपया विमा हप्त्या ऐवजी शेतकऱ्यांकडून जादा रक्कम घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. आशा सामूहिक सेवा केंद्र चालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
शिवसंग्राम संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,प्रधानमंत्री पिक विमा योजनेत खरीप २०२३ हंगामात राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ 1/- रुपया विमा हप्त्यात त्यांच्या पिकाचा विमा उतरविण्याची योजना जाहीर केली असून त्यांची अंमलबजावणी राज्यात निवडलेल्या ९ विमा कंपनीच्या माध्यमातून केली जात आहे. खरीप हंगामासाठी विमा योजनेत भाग घेण्याची मुदत ३१ जुलै प्रयन्त आहे. पिक विमा योजनेत शेतकऱ्यांची नोंदणी ही मोठ्या प्रमाणावर सामूहिक सेवा केंद्राच्या माध्यमातून होत असते. पिक विमा योजनेत सामूहिक सेवा केंद्राच्या माध्यमातून झालेल्या नोंदणीसाठी शेतकऱ्यामागे प्रति अर्ज ४० रुपये प्रमाणे रक्कम विमा कंपन्यांकडून सामूहिक सेवा केंद्र चालकांना देण्यात येते. त्यामुळे पिक विमा योजनेत नोंदणी करताना सामूहिक सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडून विमा हप्त्यापोटी 1/- रुपया घेऊन त्यांच्याकडू इतर कोणतेही शुल्क न स्वीकारता विमा योजनेत नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र असे असताना देखील देऊळगाव राजा तालुक्यातील विविध सामूहिक सेवा केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून 1/- रुपया विमा हप्ता व्यतिरिक्त २०० ते ३०० रुपये घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. पिक विमा योजनेच्या नावाखाली सामूहिक सेवा केंद्रांकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे.तरी अशाप्रकारे पिक विमा नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून पिक विमा हप्त्यापोटी जमा करावयाच्या 1/- रुपया व्यतिरिक्त इतर रक्कम सामूहिक सेवा केंद्र मार्फत घेतली जाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक सामूहिक सेवा केंद्र ग्रामपंचायत, बाजार समिती,व महत्त्वाच्या ठिकाणी याबाबत माहिती प्रदर्शित करावी.तसेच जादा रक्कम घेणाऱ्या सामूहिक सेवा केंद्र चालक यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी.अशी मागणी शिवसंग्रामचे राजेश इंगळे, जहीर पठाण,आजमत खान,शंकर वाघमारे,असलम खान, साजिद खान, शे. समीर,संतोष हिवाळे आदींनी केली आहे.

*शेतकऱ्यांनी 1/- रुपया व्यतिरिक जादा रक्कम सीएससी केंद्र चालकांना देऊ नये. शिवाय केंद्र चालक जादा रकमेची मागणी करत असल्यास तहसील कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी.आशा केंद्र चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रीती जाधव, नायब तहसीलदार दे. राजा*