Home बुलडाणा देव तारी त्याला कोन मारी ???

देव तारी त्याला कोन मारी ???

202

 

मेहकर

नांगरणी करता करता ट्रॅक्टर थेट विहिरीवर चढले, त्याची चाके काठात अडकली, आता ते थेट खोल विहिरीत कोसळणार तेवढ्यात चालकाने प्रसंगावधान राखून स्वतःसह ट्रॅक्टरला देखील वाचवले. यामुळे थोडक्यात बचावलेल्या चालकाला ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण नक्की आठवली असेल. मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा येथे आज दुपारी ही खळबळजनक घटना घडली. तेथील शंकर सोळंकी यांच्या शेतात नांगरणी सुरू होती. चालक पंकज पुंडलिक देशमुख हे ट्रॅक्टरने नांगरणी करीत होते.

सकाळपासून सुरू असलेल्या नांगरणीमध्ये दुपारी मात्र अडथळा आला. नांगरणी करताना बांधावरील विहिरीजवळ वळण घेण्याच्या प्रयत्नात वाहन विहिरीवर चढले. ट्रॅक्टरची समोरील दोन्ही चाके विहिरीच्या काठात (कठड्यात) अडकली. यामुळे वाहन असंतुलित होऊन विहिरीत कोसळते की काय अशी स्थिती निर्माण झाली. मात्र, जीवावरच्या धोक्यातही चालकाने प्रसंगावधान राखून वाहनाच्या मागे असलेला नांगराचा फाळ जमिनीत घुसवला. यामुळे ट्रॅक्टर अधांतरी अवस्थेत जागीच थांबले. यानंतर शेतात जेसीबी मागवून वाहनाला बाहेर काढण्यात आले. या घटनेची तालुक्यात चर्चा असून चालकाच्या धाडसाचे कौतुक होत आहे.