Home बुलडाणा पत्रकारास धमक्या देणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी

पत्रकारास धमक्या देणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी

307

आरोपींवर तात्काळ कार्यवाही करा ,

सिंदखेडराजा:- राजकीय वृत्त प्रकाशित करणाऱ्या प्रतिनिधीला धमक्या दिल्या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन तालुक्यातील पत्रकारांनी नायब तहसीलदार हरी वीर व ठाणेदार जयवंत सातव यांना आज दि. ६ ऑगस्ट, गुरुवारी दिले आहे.
देऊळगावराजा येथील पत्रकार मुशीरखान कोटकर ह्यांनी त्यांच्या दैनिकात कोरोना काळातही राजकीय चुकांवर टिप्पणी करणारे वृत्त दि. ३ व ४ ऑगस्ट, रोजी प्रकाशित केले आहे. त्यानंतर सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर अर्वाच्य भाषेत तसेच धमक्यांचा दर्प असलेल्या टिप्पण्या केल्या. त्यातच या कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारांची सत्यता प्रकाशात आणण्याचा पत्रकारांनी प्रयत्न करु नये, अशीही भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे. ह्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेच्या जवळपास सर्वबाबी पत्रकारांना धमकीवजा व मानसिक धक्का देणाऱ्या आहेत. याप्रकरणी मुशीरखान कोटकर ह्यांनी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात आरोपी अतिष खराट व सुरेश कोल्हे यांच्या विरोधात काल दि. ५ ऑगस्ट, बुधवारी लेखी स्वरुपात कैफियत मांडली आहे. त्याला अनुषंगून सिंदखेडराजा तालुक्यातील नपत्रकारांनी आज दि. ६ ऑगस्ट, गुरुवारी एकत्र येत तहसीलदार व ठाणेदार ह्यांच्याकडे पत्रकार मुशीर कोटकर यांना धमक्या देणाऱ्या आरोपींविरुद्ध बपत्रकार संरक्षण कायद्याला अनुसरून कठोरात कठोर कारवाई करुन अटक करण्यात यावी, अशा स्वरुपाचे निवेदन दिले आहे. निवेदनावर दीपक नागरे, रामदास कहाळे, नंदकिशोर वाघमारे, छगन झोरे, गजानन मेहेत्रे, गजानन काळुसे, फिरोज शेख, बुध्दु चौधरी , भगवान नागरे, रमेश कोंडाणे, विलास झोरे, वसीम शेख आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो कॅप्शन:-
नायब तहसीलदार हरी वीर व ठाणेदार जयवंत सातव ह्यांना निवेदन देतांना पत्रकार