Home पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा व शिक्षणासाठी एम्स नांदेडचा प्रस्ताव खासदारांना सादर

मराठवाड्यात उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा व शिक्षणासाठी एम्स नांदेडचा प्रस्ताव खासदारांना सादर

708

*नांदेड , दि.२१;( राजेश भांगे );-*
प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना ही केंद्र शासनाची योजना २००३ साली सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत नवीन ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची (एम्स) स्थापना व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे विकास करणे असे दोन प्रमुख उद्देश आहेत. त्यात प्रामुख्याने उत्तम व स्वस्त दर्जाची आरोग्यसेवा, उत्तम दर्जाचे वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण आणि राज्याराज्यातील तफावत कमी करणे हा प्रमुख उद्देश आहे. २०२० पर्यंत केंद्र शासनाने आठ टप्प्यात २२ एम्संना परवानगी दिली आहे. यात सहा एम्स कार्यान्वित झालेली आहेत आणि १५ एम्सला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आलेली आहे. २०१५ साली चौथ्या टप्प्यात नागपुर एम्सला १५७७ करोड रुपये निधी मिळाला आहे. तसेच उत्तर प्रदेश, बिहार आणि जम्मू कश्मीर या तीन राज्यांमध्ये दोन-दोन एम्सला परवानगी मिळालेली आहे.
मराठवाड्यात स्थानिक, तेलंगणा व कर्नाटक अशा तीन राज्यातून पेशंट येत असतात. जेव्हा गंभीर स्वरूपाचा आजार होतो, तेव्हा रोग्यांना हैदराबाद, मुंबई, औरंगाबाद अशा ठिकाणी पेशंट हलविण्यास डॉक्टर सल्ला देत असतात. गरीब व मध्यम वर्गीयांना ही सेवा परवडणारी नाही, बऱ्याच वेळेस पेशंट दगावत असतात. तसेच राष्ट्रीय दर्जाच्या शेकडो संस्थापैकी जसे एम्स, आयआयटी, आयआयएम, केंद्रीय विद्यापीठ अशी एकही केंद्र शासनाची शैक्षणिक संस्था मराठवाड्यात नाहीत, हे फार मोठे दुर्दैव आहे. त्यामुळे उत्तम दर्जाची आरोग्यसेवा, उत्तम दर्जाचे वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण आणि राज्यातील तफावत कमी करण्यासाठी मराठवाड्याला एक नवीन एम्सची नितांत आवश्यकता आहे. यासाठी एसजीजीएस नांदेड महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. रवींद्र जोशी यांनी नांदेडचे खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना एम्स नांदेडचा प्रस्ताव सादर केलेला आहे.
या प्रस्तावाअंतर्गत एमबीबीएसच्या १००, एमएसच्या ६० जागा, बीएससी नर्सिंगच्या ६० जागा, ७५० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल, १५०० ओपीडी, १००० आयपीडी, १५-२० सुपर स्पेशालिटी विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, गेस्टहाऊस, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, निवासी व्यवस्था अशा अनेक सुविधा असणार आहेत. यात प्राध्यापक व कर्मचारी अशा ४००० लोकांना स्थायी नियुक्ती मिळेल व अप्रत्यक्षरित्या कॅन्टीन, साफसफाई, सुरक्षा, गार्डन अशा ४००० लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त बांधकाम, हॉटेल, ट्रान्सपोर्ट अशा अनेक माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल. हा एकूण अंदाजीत सोळाशे करोड रुपयांचा प्रस्ताव आहे.
या प्रस्तावाची बैठक सुरु असताना मा. खासदार यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि डॉ. म्हैसेकर यांनी प्रस्तावात जातीने लक्ष घालून केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले. श्री प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले की मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी बांधील आहे आणि उत्तम दर्जाच्या केंद्र शासनाच्या शैक्षणिक संस्था मराठवाड्यात आणण्यासाठी मी जातीने पुढाकार घेईन असे आश्वासन दिले. हे नवीन एम्स नांदेडला आणण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार जेणेकरून येथील भूमिपुत्रांना रोजगार मिळेल, असे त्यांनी सांगितले. या बैठकीत माननीय खासदार श्री प्रताप पाटील चिखलीकर, डॉ. रवींद्र जोशी, श्री प्रवीण पाटील, अभियंता श्री महेश वाघमारे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.