
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
पुरुष विभागात निमगव्हाण तर महिला विभागात चंद्रपूर येथील भजनी मंडळास प्रथम पुरस्कार.!
वर्धा , दि. १३ :- जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील रेहकी येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेत गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव मानवसेवा छात्रालयाच्या बाल भजन मंडळाने दरवर्षीप्रमाणे आपले अव्वल स्थान कायम ठेवले असून पुरुष विभागातून निमगव्हाण तर महिला विभागातून चंद्रपूर येथील भजनी मंडळाने प्रथम पुरस्कार प्राप्त केला.
रेहकी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त स्थानिक गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बाल विभागात ९, महिला विभागात १४ तर पुरुष विभागात १६ भजनी मंडळ अशा एकूण ३९ भजनी मंडळानी सहभाग घेतला. यामध्ये बाल विभागातील प्रथम पुरस्कार गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव मानवसेवा छात्रालयाच्या बाल भजन मंडळाने, द्वितीय तळेगांव (श्या.पं.) येथील श्री गुरुकृपा बाल भजन मंडळ तर तृतीय भेंडाळा येथील श्री जय गुरुदेव बालीका भजनी मंडळाने पुरस्कार प्राप्त केला. पुरुष विभागातून प्रथम पुरस्कार निमगव्हाण येथील श्री आदर्श गुरुदेव भजनी मंडळ, द्वितीय यवतमाळ येथील महाराणा गुरुदेव सेवा भजन मंडळ तर तृतीय पुरस्कार घाटसावली येथील श्री बालाजी गुरुदेव सेवा मंडळाने प्राप्त केला. महिला विभागातून प्रथम पुरस्कार इंदिरा नगर चंद्रपूर येथील संतकृपा महिला भजन मंडळ, द्वितीय नेहरू नगर चंद्रपूर येथील जिजाऊ महिला भजन मंडळ तर तृतीय पुरस्कार दक्षिण नागपूरातील ओम जय भारती महिला भजन मंडळाने प्राप्त केला.
शुक्रवारी रात्री उद्घाटनानंतर सुरु झालेली राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा ही रविवारी रात्री उशिरा संपली. तदनंतर रात्री दोन वाजता मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे संचालन किरण मुजबैले, देविदास झाडे, योगेश घुमडे यांनी तर आभार प्रदर्शन गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर सावरकर यांनी केले. राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेत सहभागी भजनी मंडळ व अतिथींचे स्वागत माजी जि.प. सभापती सोनालीताई अशोक कलोडे यांनी केले.