
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : धावत्या ट्रॅक्टरवर उभ्या असलेल्या युवकाचा तोल जाऊन तो थेट चाकाखाली सापडल्याची धक्कादायक घटना मलकापूर पांग्रा येथे घडली. या भीषण अपघातात युवक ठार झाला असून, अपघातानंतर सहकाऱ्यांनी वेळेत मदत न केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
माहितीनुसार, भुमराळा येथील विनानंबर नवीन फार्मट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर पेन सांगवीकडे जात असताना पंडित नेहरू विद्यालयासमोरील पुलाजवळ ही घटना घडली. ट्रॅक्टर चालकाच्या बाजूला उभा असलेला समाधान दळवी (वय अंदाजे ३५, रा. भुमराळा) याचा अचानक तोल गेला आणि तो मधल्या टायरखाली सापडत फरफटत गेला. या भीषण घटनेत समाधान दळवी गंभीर जखमी झाला. मात्र, चालक किशोर टेकाळे व इतर सोबतींनी तत्काळ मदत करण्याऐवजी केवळ पाहत राहिल्याचा आरोप उपस्थितांकडून केला जात आहे. जखमी अवस्थेत पडलेल्या दळवी यांना रुग्णालयात नेण्यासाठीही उशीर करण्यात आला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतरच जखमीला उशिरा बीबी येथे उपचारासाठी हलविण्यात आले.डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. दरम्यान, ट्रॅक्टरवरील काहीजण मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.














































