
बुलडाणा…
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या इस्लामपूर शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या यंदाच्या लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय 2025 पुरस्कारांची घोषणा राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा शामराव पाटील,शाखेचे अध्यक्ष दिपक स्वामी आणि प्रा धर्मवीर पाटील यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे नुकतीच केली आहे,
प्रख्यात मराठी कवी,नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांच्या अथर्व पब्लिकेशन जळगावने प्रसिद्ध केलेल्या ,,वळीवाच्या वेळा,, या बहुचर्चित कवितासंग्रहास लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार2025 जाहीर झाला आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रेरणादायी स्मृती जपण्यासाठी गत 30 वर्षांपासून 8 मार्च रोजी साहित्य संमेलनाचे भव्यदिव्य केले जाते.ईश्वरपूर येथे संपन्न होणाऱ्या या 30 व्या साहित्यसंमेलनात प्रसिद्ध लेखिका कवयित्री प्रज्ञा पवार यांच्याहस्ते उपरोक्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रख्यात मराठी कवी आणि श्रोताप्रिय नामवंत निवेदक अजीम नवाज राही महाराष्ट्र राज्याच्या लेखणी आणि वाणी या दोन क्षेत्रातील महत्वाचं आणि वलयांकित नाव.
व्यवहाराचा काळा घोडा,कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार, तळमळीचा तळ आणि अथर्व पब्लिकेशन जळगाव तर्फे नुकताच प्रसिद्ध झालेला ,, वळीवाच्या वेळा,, या पाच कवितासंग्रहांचे ते धनी आहेत.
अजीम नवाज राही हे नाव नवनिर्मितेचे प्रयोगाशीलतेचे बलस्थान असून कुठल्याही मळक्या वाटेने न जाता स्वतःची नाममुद्रा त्यांनी वर्तमान मराठी कवितेच्या पानावर ठसठशीतपणे उमटवली आहे.अजीम नवाज राही यांच्या कवितेने परिघावरचे विश्व मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी आणले. त्यांच्या कवितेतील व्यक्त होणारे दुःख सर्वसामान्यांच्या,शेतकरी,
शेतमजुर, कामगारांच्या,शोषितांच्या किंबहुना अस्तित्वहीन माणसाच्या जगण्यातले आहे.
प्रतितिष्ठासंपन कितीतरी श्रेष्ठ पुरस्कारांचा त्यांच्या कवितासंग्रहांवर वर्षाव झाला आहे.
लोकनेते राजारामबापू उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार 2025 प्राप्त ,,वळीवाच्या वेळा ,, कवितासंग्रह समकालीन समाजमनाचं लख्ख प्रतिबिंब आहे. विद्यमान आव्हानांशी थेट भिडताना ,,वळीवाच्या वेळा,, मधली कविता आक्रस्ताळी वा कंठाळी होत नाही. धर्म,जात,पंथाच्या तटबंदीत न अडकता माणसांची निखळ काळजी वाहते.वास्तवाचा,सकसतेचा, प्रयोगशीलतेचा ध्यास असलेली ही कविता भाषिकअंगाने, अनुभवाच्या अंगाने अगदी समृद्ध आहे.समग्र चिंतीत वर्तमान कवेत घेणारी आहे.
त्यांच्या कवितेतली गर्दगहिरी वस्तुनिष्ठता, घनगर्द सच्चाई, प्रतिमाशृंखलांचे अनोखे लावण्य, मातीचा सुवास लेवून आलेली भरजरी,चवदार भाषा.स्वतःची घडवलेली खास मृदगंधी शब्दकळा, ही मोठी दौलत घेऊन जगणारे,लिहिणारे
अजीम नवाज राही वर्तमान पिढीतील महत्वाचे कवी आहेत. कवितागणिक,
कवितासंग्रहागणिक त्यांच्या कवितेचे निराळेपण अधोरेखित झाले आहे. रेखांकित झाले आहे. मुस्लिम संस्कृती आणि या संस्कृतीबाहेरचा सर्वधर्मीय भोवताल, जीवनरितींचे बहुपदर घेऊन उभी राहिलेली त्यांची कविता मूळात मानव्याचे सुक्त गाणारी आहे.
अजीम नवाज राही यांना आजतागायत अमेरिकेतील फाउंडेशन,भारतातील केशव गोरे स्मारक ट्रस्ट मुंबईचा साहित्य प्रांतातील प्रतिष्ठेचा महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय लेखनाचा कवी केशवसुत पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तीबोध, नारायण सुर्वे पुरस्कार ,आपटे वाचन मंदिर इचलकरंजीचा इंदिरा संत पुरस्कार,शरद पवार ग्रंथ पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, लोकमत समूहाचा लोकमत साहित्य पुरस्कार, भि ग रोहमारे पुरस्कार, शिवसेना नवरत्न पुरस्कार, ना घ देशपांडे पुरस्कार, मराठा सेवा संघ जिजाऊ साहित्यरत्न पुरस्कार, शिक्षण महर्षी तात्याराव मोरे पुरस्कार,कविवर्य देवानंद गोरडे पुरस्कार,मराठवाडा साहित्य परिषद,साहित्य परिषद पुणेचा पुरस्कार,प्रज्ञा उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार इत्यादी मातब्बर पुरस्कार मिळाले आहेत.
इयत्ता 10 वी ,इयत्ता 11वी व महाराष्ट्राच्या 11 विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अजीम नवाज राही यांच्या कवितांचा समावेश आहे.













































