
112 ला कॉल करूनही मदत पोहचली नाही; तहसीलदार मॅडमना फोन लावताच रेतीवाल्यांचा सुळसुळाट! उशिरा आलेल्या प्रशासनाला गावकऱ्यांचा ‘विनोदपूर्ण’ हारतुरे स्वागत
प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव
देऊळगाव मही:-तालुक्यातील देऊळगाव मही येथे रेती माफियांच्या बेधडक कारवायांचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे.देऊळगाव मही येथील प्रदीप भाऊ हिवाळे यांच्या घरासमोर भरधाव वेगात आलेल्या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या कारने जोरदार धडक दिली आणि त्यानंतर गाडी घेऊन पळ काढला.
यावेळी शेतकरी नेते मधुकर शिंगणे
यांनी तत्काळ ठाणेदारांना फोन केला असता त्यांनी “112 ला फोन करा” असा सल्ला दिला. 112 ला कॉल केल्यानंतरही कोणतेही पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले नाही.
दरम्यान, शिंगणे यांनी तहसीलदार मॅडमना फोन लावल्यानंतर, टिप्पर आणि अवैध रेतीवाहनांमध्ये एकच खळबळ उडाली आणि सर्व वाहनं गावातून पसार झाली! हे पाहून गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
घटनास्थळी तहसीलचे पथक उशिरा दाखल झाले. त्यांच्या आगमनापूर्वी गावकऱ्यांनी दोन तास चर्चा करून तहसील कार्यालयाकडून कारवाईची मागणी केली. पण जेव्हा तहसील पथक अखेर गावात पोहोचले, तेव्हा गावकऱ्यांनी त्यांचे हार घालून ‘व्यंगात्मक’ स्वागत केले.
या प्रकारामुळे गावात प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी आणि रोष व्यक्त केला जात आहे. अवैध रेती तस्करांवर त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांची मागणी:
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत
रेती माफियांची माहिती देणाऱ्यांचे संरक्षण करावे
पोलीस व महसूल यंत्रणेची संयुक्त कारवाई नियमितपणे करावी
देऊळगाव मही परिसरात रेती वाहतुकीवर कडक नजर ठेवावी ही घटना केवळ एक अपघात नसून प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेची लाजिरवाणी साक्ष आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाला दाखवलेली विनोदात्मक चपराक आता कारवाईच्या स्वरूपात उतरते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.











































