Home साहित्य जगत रमाई यांच्या जयंती निमित्याने…..

रमाई यांच्या जयंती निमित्याने…..

71
0

शब्दांना उसनं अवसान नाही आणता येत
आढेवेढे घेतात शब्द
तुझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच
रडवेले होतात शब्द

तू थापलेल्या गोवऱ्याभोवती थबकतात शब्द
तुझ्या डोळ्यातल्या आसवासारखी
सुकून जातात शब्द
डॉक्टरसाहेबांच्या वाचन वेडापायी
तू केलेल्या भाजी-भाकरीच्या ताटाजवळ
रात्रभर उपाशी राहतात शब्द
तुझ्या गंगाधराच्या प्रेताजवळ
धाय मोकलून रडतात शब्द

तुझ्या फाटक्या पदरातून
गळून पडतात शब्द
साहेबांनी लपवलेल्या कुंकवाच्या करंड्याजवळ
लालेलाल होतात शब्द
तुझ्या घराभोवती वेळी-अवेळी
‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’
ही घोषणा ऐकून निळीशार होतात शब्द

माय,
तू आमच्यासाठी
नात्यातला भावविव्हळ ओलावा
भावनांचं उचंबळून येणं म्हणजे तू
अश्रूंनी सैरभैर होणं म्हणजे तू
असीम सौंदर्याचा लेणं म्हणजे तू
आभाळापासून आभाळपण घेणं म्हणजे तू

तू आमच्या आयुष्याचा पाया
तू सर्वांसाठी आभाळाची माया
तू हळवा कोपरा बाईपणाचा
तू सुगंधी मोगरा माणूसपणाचा

तुझं नाव घेताच
शब्द कशी होतात शहाणी
लहान मुलासारखी आज्ञाधारक
आणि उभी राहतात शिस्तीत
तुला मानवंदना देण्यासाठी

तुझ्यावर कविता लिहिणं म्हणजे
आसवांच्या महायात्रेला शिस्त लावण्याचीच शिकस्त

शब्द तुझ्या वेदनेशी एकरूप तर होतात
पण
अव्यक्त राहतात तुझ्या कारुण्यापासून
शब्द करीत नाहीत शब्दबद्ध स्वत:ला
हरवून जातात ते तुझ्या एकटेपणात

सांग माय…..
तुझ्यावर कविता लिहिण्यासाठी
मी शब्द कुठून आणू…..?

प्रशांत वंजारे

आर्णी जी. यवतमाळ