
दुसरबीड गुलशेर शेख दि.२१ जून
येथील शिक्षक कॉलनीत वीज पुरवठा करणाऱ्या रोडजवळ असलेल्या विद्युत डीपीला दुपारी अचानक आग लागली. नागरिकांनी धाव घेऊन वेळीच महावितरणच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना माहिती देत आग विझविल्याने डीपीचे नुकसान टळले. महावितरणची मान्सुनपुर्व काहीच देखभाल दुरुस्ती नसल्याने वीज देयके नियमीत भरणाऱ्या ग्राहकांनी तीव्र नाराजी दाखवत रोष व्यक्त केला आहे.
महावितरणकडून डीपीची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्यामुळे गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. आज दुपारच्या सुमारास अचानक मोठा आवाज होऊन डीपीला आग लागली. डिपी मध्ये विद्युततारा जोडल्या नंतर एकमेकांना चिटकू नये म्हणून त्यामध्ये रबरी वस्तू किंवा इतर प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर महावितरणचे कर्मचारी करत आहे. सद्या उन्हाचा पारा वाढलेला आहे. यामुळे ताराही गरम होऊन मध्येच अडकवलेले रबरी वस्तु किंवा प्लॅस्टिक निघाल्याने स्पार्किंग होते. यामुळे अचानक डिपीच्या खालच्या भागात आग लागली. नागरिकांनी विज पुरवठा बंद झाल्यावर पाणी टाकून आग विजवली.
महावितरणाच्या कारभाराने नियमित वीज देयके भरणारे ग्राहक त्रस्त असून अधिकाऱ्यांचे मान्सूनपूर्व कामांसह विविध समस्यांकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. गावातील प्रत्येक वार्डात असणारे डीपी उघडेच असून याकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मात्र याकडे अद्यापही महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. अनेक ठिकाणी वीज खांबांवर व रोहित्राशेजारी झाडाझुडपांचा, वेलींचा विळखा वाढला असून सध्यातरी मान्सून कोसळण्यापुर्वीची कामे महावितरणने मार्गी लावावीत अशी मागणी होत आहे.













































