Home बुलडाणा भारतीय स्त्री शिक्षणाच्या उद्धारक: सावित्रीमाई ज्योतिराव फुले…

भारतीय स्त्री शिक्षणाच्या उद्धारक: सावित्रीमाई ज्योतिराव फुले…

335

 

कैलास राऊत( बुलढाणा )11 मार्च 2022. भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा आज, १० मार्च स्मृतिदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीमाईनां त्यांच्या १२६व्या स्मृतीदिन दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!


भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा आज १० मार्चला स्मृतिदिन म्हणुन त्यानां संपूर्ण भारतात अभिवादन करण्यात येते , स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीमाईंना त्यांच्या १२६व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी जन्मलेल्या सावित्रीमाई या ९ वर्षांच्या असताना इस १८४०मध्ये त्यांचा विवाह १३वर्षे वयाच्या तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. लहानपणापासून ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते. अस्पृश्याचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. अशा अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीमाईनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली. ब्राम्हणी जातीव्यवस्थेच्या व मनुस्मृतीच्या बंधनात अडकलेल्या सर्वांनाच शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य ज्योतिराव व सावित्रीमाई यांनी केले. १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून या दाम्पत्याने प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. काही धर्ममार्तंडांनी ‘धर्म बुडाला’ अशी ओरड केली व सावित्रीबाईंवर धर्मबुडवी म्हणून ते शेणमाती, दगड फेकू लागले. तरीसुद्धा त्या मागे हटल्या नाहीत. अस्पृश्यांना शिकविल्यामुळे सनातनी मंडळी जास्तच चिडली. त्यांनी ज्योतिरावांच्या वडिलांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे ज्योतिरावांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सावित्रीमाई फुले यांना घराबाहेर पडणे भाग पडले. अशाही परिस्थितीत सावित्रीमाई मुळीच डगमगल्या नाही , घाबरल्या नाही किंवा त्यांनी हिम्मत सोडली नाही. ज्योतिरावांच्या कार्यात त्यांनी पूर्णपणे साथ देण्याची तयारी केली होती. सावित्रीमाई फुले अशिक्षीत होत्या. त्यांना ज्योतिराव फुले यांनी घरी शिकविले व नंतर शाळेत शिक्षण देण्याचे कार्य सावित्रीमाईंनी केले. सन १८४८ ते १८५२पर्यंत त्यांनी एकूण १८ शाळा काढल्या. त्यांच्या शाळेची नोंद सरकारी दफ्तरात झाली तेव्हा १२ फेब्रुवारी १८५२ मध्ये मेजर कॅन्डी यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळांना सरकारी अनुदान जाहीर केले. शिक्षणाची महती गाताना सावित्रीमाई म्हणतात…
विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून,
तिचा साठा ज्यापाशी, तो ज्ञानी मानिती जन…..
त्याकाळी बालविवाहामुळे अनेक मुली गरोदर असताना विधवा झाल्या. त्यांच्याकरिता या फुले दाम्पत्याने १८६३ रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृहही सुरू केले. केशवपनाविरुद्ध नागरिकांना संघटीत करून नाभिकांचा संप घडवून आणण्याचा कल्पक उपक्रम कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी केला. त्यामागची प्रेरणा सावित्रीबाईंचीच होती. इतकेच नव्हे तर विधवा आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या यशवंतला दत्तक घेऊन सावित्रीमाईनी त्याला डॉक्टर केले.
जुलै १८८७मध्ये ज्योतिरावांना पक्षाघाताचा आजार झाला. त्याचे उजवे अंग लुळे पडले. त्यांच्या आजारपणात सावित्रीमाईंनी त्यांची अहोरात्र शुश्रुषा केली. २८ नोव्हेंबर १८९० रोजी तात्यासाहेब ज्योतिरावांचे त्या आजारात दुर्दैवी निधन झाले. अत्यंयात्रेच्यावेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावाचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले. त्यावेळेस सावित्रीमाई धैर्याने पुढे आल्या व स्वत: टिटवे धरले. अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वत:च्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी ४ फेब्रुवारी १८८९ रोजी विवाह यशवंतचा करून दिला. हाच महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय. ही अशक्य वाटणारी गोष्ट सावित्रीमाईंनी करून दाखवली, २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर ज्योतिरावांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळीचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी सावित्रीमाईवर आली. १८९३ रोजी सासवड येथे झालेल्या ‘सत्यशोधक परिषदे’चे अध्यक्षपद सावित्रीमाईंनी भूषविले. आपल्या विचाराचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले व‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या काव्यरचना त्यांनी लिहिल्या.१८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.
सावित्रीमाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीमाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू ‘नियतकालीकाने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्‍या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीमाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.आजच्या स्त्रियांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात भरारी घेतलेली आहे त्यांना ऊर्जा देण्याचे कार्य सावित्रीमाई यांचे जीवन कार्य करते अशा थोर समाज सुधारक स्त्रीशिक्षणाच्या उद्धारक सावित्रीमाई फुले यांना त्यांच्या १२६व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..

पञकार कैलास राऊत देऊळगाव माळी 9561596693..