
कर्जत : जयेश जाधव
कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथून मोटर सायकल, रिक्षा चोरणारा चोर कर्जत पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला आहे, त्याने 3 लाख 70 हजार किंमतीची 5 वाहने चोरली होती. कर्जत पोलिस ठाणे हद्दीमध्ये वाढत्या चो-यांवर प्रतिबंध करण्याकरिता दि.21 मार्च 2021 रोजी कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रगटीकरण पथक कर्जत शहरामध्ये पेट्रोलिंग करीत होते, पथक हे किरवली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ पेट्रोलिंग करीत असताना एक संशयित ऑटोरिक्षा क्रमांक एम एच-05 डी क्यू 9644 ही नेरळ बाजूकडून कर्जतकडे येत असल्याच पथकास दिसले, त्या वेळी सदर ऑटो रिक्षा चालकास थांबून त्याच्याकडे ऑटोरिक्षा कागदपत्राची व वाहन चालविण्याच्या परवान्याची मागणी केली असता सदर इसमाकडे कोणत्याही प्रकारचे ऑटोरिक्षा चे कागदपत्र आढळून आले नाही व सदर ऑटोरिक्षा ही त्याच्या कर्जत येथील मित्राची असल्याबाबत सांगून तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, त्यावेळी पथकाने कार इन्फर्मेशन ॲप द्वारे ऑटो रिक्षा ची माहिती काढली असता सदरची ऑटोरिक्षा ही सुधीर मधुकर गांगुर्डे यांच्या नावे असल्याचे आढळून आले, त्या सदर ऑटोरिक्षा ही चोरीची असल्याबाबत पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने कर्जत तालुक्यातील तमनाथ येथे राहत असून माझे नाव संदेश शिवाजी बोराडे (वय -18 ) वर्ष असे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी ऑटोरिक्षा पोलीस ठाणे येथे आणले सदर इसमाकडे चौकशी केली असता सदरची ऑटोरिक्षा ही काही दिवसापूर्वी त्याने कल्याण इथून चोरी करून आणल्याचे कबूल केले, त्याबाबत सदर इसमाविरुद्ध सरकार तर्फे पोलीस अंमलदार अश्रुबा बेंद्रे यांनी खबर देऊन कर्जत पोलीस ठाणे येथे फौजदारी प्रक्रिया संहिता 41 (1)(ड) म.पो.का.क.124 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
सदर इसमास न्यायालयाची परवानगी घेऊन अटक करून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर आरोपी याने मागील तीन महिन्यांपासून कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथून 2 बजाज कंपनीच्या ऑटोरिक्षा, 2 बुलेट मोटरसायकल, 1 हिरो होंडा फॅशन प्रो मोटरसायकल असे 3 लाख 70 हजार रुपये किमतीचे एकूण 5 वाहने चोरी करून आल्याचे तपासात कबूल केले, सदर वाहने ही पोलिसांनी आरोपी कडून जप्त करून कल्याण, अंबरनाथ, बदलापूर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क करून माहिती दिली, 5 ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस अंमलदार सुभाष पाटील, पोलीस अंमलदार भूषण चौधरी, पोलीस अंमलदार अश्रुबा बेंद्रे, पोलीस अंमलदार आकाश राठोड, पोलीस अमदार सुहास काबुगडे यांनी केली.











































