Home बुलडाणा पन्नास लाख रूपायाचा प्रतिबंधित गुटखा जप्त चालकास अटक

पन्नास लाख रूपायाचा प्रतिबंधित गुटखा जप्त चालकास अटक

257

 

अमिन शाह

बुलडाणा
बुऱ्हाणपूर ते वरवट बकाल या मार्गावर अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने कठोर कारवाई केली आहे. एका मालवाहू वाहनातून नेण्यात येत असलेला तब्बल ५० लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांचे पथक गस्त घालत होते. त्याचवेळी त्यांना गुप्त माहिती मिळाली की, बुऱ्हाणपूर-वरवट बकाल मार्गावरून अकोला-यवतमाळकडे जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या अशोक लेलँड मालवाहू वाहनातून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तात्काळ शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वरवट बकाल ते शेगाव रोडवरील यादव बेकरीसमोर नाकाबंदी केली.

रात्री सुमारे १०.१० वाजता संशयित वाहन क्रमांक एमएच-४०-जीटी-२९६५ तेथे येताच पोलिसांनी ते थांबवून चौकशी केली. वाहनचालकाने आपले नाव सुरुर अहमद नूर अहमद (वय ३७, रा. फिरदोस कॉलनी, अकोला) असे सांगितले. वाहनातील मालाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तात्काळ वाहनाची तपासणी केली असता, त्यांना धक्काच बसला. वाहनामध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित

कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. यामध्ये ‘बाजीराव गोल्ड’, ‘मस्तानी टोबॅको’, ‘नजर १०००’, ‘एन-०५ प्रीमियम च्युइंग टोबॅको’ तसेच ‘प्रीमियम नजर ९०००’ या ब्रँडचा माल होता.

जप्त करण्यात आलेल्या या प्रतिबंधित मालाची एकूण किंमत ५० लाख १३ हजार ९२० रुपये इतकी आहे. या गुटख्यासह संबंधित मालवाहू वाहनही जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ७० लाख १३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

या कारवाईनंतर पोलिसांनी हे वाहन ठाण्यात लावले असून, पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग, बुलढाणा यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या आदेशाने ही यशस्वी कारवाई करण्यात आली. या कारवाईत पीएसआय सुनील राऊत, पोहेकॉ सुधाकर थोरात, योगेश कुंवारे आणि पोलीस शिपाई मंगेश सोळंके यांनी सक्रिय सहभाग घेतला.