Home यवतमाळ सराटीच्या भजन मंडळाने पटकावला तेलंगणा राज्यात प्रथम क्रमांक

सराटीच्या भजन मंडळाने पटकावला तेलंगणा राज्यात प्रथम क्रमांक

324
प्रतिनिधी – विरेंद्र चव्हाण
मोहदा- सराटी येथील सत्संग गुरुदेव सेवा भजन मंडळ यांनी बेला जी.आदिलाबाद (तेलंगणा) येथे दि. 21 व 22 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेत दैदिप्यमान आणि ऐतिहासिक यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. चार गटांमध्ये — बाल गट, शहरी पुरुष गट, महिला गट आणि ग्रामीण पुरुष गट — पार पडलेल्या या स्पर्धेत ग्रामीण पुरुष गटातून सादर केलेल्या प्रभावी, सुरेल व भक्तिमय गायनाने परीक्षकांची मने जिंकली. दुसऱ्या राज्यात मिळवलेला हा भव्य विजय मंडळाच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे फलित ठरला आहे.
या उल्लेखनीय आणि अभिमानास्पद यशात स्वप्निल ठाकरे, तेजस वाकडे, प्रतीक तोंदवाल मारुती काकडे, रोशन चांदेकर, चंद्रकांत सुरपाम,अभिजीत ठाकरे, सुरज ठाकरे, रोहन घरत,गोविंदा काकडे,शंकर ठाकरे, , संतोषराव दूधकोहळे सतीश शहारे,सुनील चिंतकुंतलवार व रमण काकडे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याच स्पर्धेत गावातील “परिवर्तन युवा गुरुदेव सेवा भजन मंडळ” यांनीही लक्षणीय आणि प्रशंसनीय यश मिळवत गावाच्या कीर्तीत भर घातली.
मंडळ वर्षभर ग्रामस्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती-पुण्यतिथी कार्यक्रम तसेच विविध आध्यात्मिक व सामाजिक उपक्रम राबवत असते. यावर्षी विदर्भातील सुमारे 40 ते 45 स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण व घवघवीत यश मिळवत मंडळाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या शानदार कामगिरीनंतर गावात उत्साहाचे, अभिमानाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या पिढीला राष्ट्रसंतांच्या विचारांची प्रेरणा मिळत आहे.
मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल भाऊ ठाकरे म्हणाले, “आमचा हा विजय पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल. अविरत मेहनतीच्या जोरावर पुढील वर्षीही गाव व जिल्ह्याचे नाव अधिक उज्ज्वल करू.”