
प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव
देऊळगाव मही:-अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भरोसा येथील विवाहिता सौ. शीतल गणेश थुट्टे (वय २६) हिने तिच्या देवांश या अवघ्या काही महिन्याच्या मुलासह गावातील शेतकरी दिनकर जाधव यांच्या मालकीच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.या दुर्दैवी घटनेनंतर काल (दि.६) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नसून, तीनच वर्षापूर्वी तिचा गावातील शेतकरी गणेश थुट्टे याच्याशी विवाह झाला होता. घटनेनंतर या मायलेकाला वाचविण्यासाठी गावातीलच सिद्धार्थ निंबाजी शिरसाट (वय ३६) यांनी विहिरीत उडी घेतली. या दोघांना पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी जिवाची बाजी लावली होती. सिद्धार्थ शिरसाट हे पट्टीचे पोहणारे होते. परंतु, रात्र होत असल्यामुळे पडलेला काळोख अंधार व विहिरीतील गाळ यांच्यात ते फसले आणि दुर्देवाने त्यांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना घडत असताना घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन समय सुचकता दाखवत गावातीलच या तिघांना वाचविण्यासाठी गावातीलच सुखदेव त्र्यंबक थुट्टे (वय ५५) यांनी विहिरीत उडी घेतली. तेही बुडू लागल्यानंतर काठावरील गावकर्यांनी तातडीने विहिरीत दोर सोडून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे आणखी मोठा अनर्थ टळला.या घटनेची माहिती पोलिस पाटलांनी अंढेरा पोलिसांना दिली असताना, घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन खंडेराव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी त्यांच्या सहकार्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्रीचा अंधार व विहिरीत गाळ असल्याने रात्रभर मृतदेह विहिरीतच होते. पहाटे हे तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आले घटनेचा पंचनामा पंचासक्षम करून मृतदेह चिखली येथील ग्रामीण रूग्णालयात शवपरीक्षणासाठी पाठवण्यात आले होते .त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी भरोसा येथेही तीनही मृतदेहांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घडलेल्या या विपरीत घटनेने भरोसा सह पंचक्रोशीत शोककळा पसरलेली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली असून, वृत्तलेपर्यंत मर्म दाखल करण्यात आला नव्हता. घटनेचा पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार कैलास उगले, भरत पोफळे,गिरी , सोनकांबळे,जाधव करीत आहे












































