Home महत्वाची बातमी कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात औषध फवारणी नंदुरबार जि प चे मुकाअ...

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात औषध फवारणी नंदुरबार जि प चे मुकाअ श्री विनय गौडा यांची माहिती ,

479

जीवन महाजन

नंदुरबार (प्रतिनिधी):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागात उपाययोजना सुरु केली आहे. याअंतर्गत प्रत्येक गाव व पाड्यात जंतुनाशक फवारणी करणे, गावांमध्ये आलेल्या बाहेरील व्यक्तींची माहिती संकलित करणे व त्या व्यक्तीला होम क्वारंटाइन करणे, अशा उपाय योजनांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी दिली.
सबंध मानवजातीवर भयावह संकट बनुन आलेल्या करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभर विविध उपाय योजना केल्या जात असून, गेल्या तीन महिन्यांपासून करोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून हा विषाणू फैलावत असून, या आजाराच्या दुष्परिणामांचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन विविध उपाययोजना करत आहे. देशातील अनेक राज्य लॉकडाऊन करण्यात आले असून, महाराष्ट्रात तर जिल्हा बंदीही लागू करण्यात आली आहे. याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या असून, नंदुरबार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व गावांतील पान ठेले, पान टपऱ्या व गुटखा तंबाखू विक्रीची दुकाने सील करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सोडियम हायड्रोक्लोराईड औषधाची फवारणी सुरू केली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनाच्या सूचना जनतेपर्यंत पोचाव्यात यासाठी प्रत्येक गावात दवंडी दिली जात आहे. शहरालगतच्या ग्रामपंचायतींमध्ये शहरात सुरू असलेल्या उपाययोजनांचीच अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक तालुकास्तरावर सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच ग्राम विस्तार अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी सोपविलेल्या गावांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच औषध फवारणी व स्वच्छता याविषयी कार्यवाही सुरू केलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यात बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून, अश्यांना होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसून आल्यास त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अश्या पध्दतीने खबरदारी घेतली जात असून, जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी सांगितले.