Home विदर्भ मुंबईहून आलेले प्रवासी तपासणीनंतर वरूडकडे बसने रवाना

मुंबईहून आलेले प्रवासी तपासणीनंतर वरूडकडे बसने रवाना

69
0

कुठलीही अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा – जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. २२ : मनिष गुडधे अमरावती बसस्थानकावर मुंबईवरून आलेले काही प्रवासी अडकल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तत्काळ दखल घेत प्रवाश्यांची तपासणी करून त्यांना वरुड येथे जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
जनता कर्फ्युमुळे वाहतूक सेवा बंद होती. त्यामुळे मुंबईहुन आलेले काही प्रवासी बसस्थानकात अडकले होते. पत्रकार संजय शेंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यानुसार सर्वांची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यात आली व त्यांना आवश्यक दक्षतेबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानंतर वरूड येथे जाण्यासाठी एका बसची व्यवस्था करण्यात आली. त्याबद्दल प्रवाशांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला असून, त्यानुषंगाने विविध निर्देश देण्यात आले आहेत. *प्रतिबंधात्मक उपायांनीच या संसर्गावर मात करता येणे शक्य आहे*. त्यामुळे नागरिकांनीही घाबरून न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार दक्षता घ्यावी. कुठलीही माहिती लपवू नये. स्वतःची, स्वतःच्या कुटूंबाची व जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी व साथरोग प्रसारास आळा घालण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

शासनाकडून वेळोवेळी अधिकृत माहिती प्रसारित करण्यात येत आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. सजग राहून खबरदारी घ्यावी. कुठलीही शंका असल्यास हेल्पलाईनला फोन करून माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. *हेल्पलाईनसाठी जिल्हाधिकारी कार्यालय टोल फ्री क्रमांक 1800 233 6396 व संवाद कक्षाचा (0721) 2661355 असा आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दूरध्वनी क्रमांक (0721) 2663337, आपत्ती नियंत्रण कक्षाचा (0721) 2662025, अमरावती महापालिकेचा 8408816166, तर जिल्हा परिषदेचा (0721) 2662591, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचा (0721) 2665041, तर पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्षाचा (0721) 2551000 असा आहे*.

राज्य नियंत्रण कक्षाचा (020) 26127394, एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष (020) 27290066 आणि टोल फ्री क्रमांक 104 हा आहे.