Home महत्वाची बातमी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा नको, मध्यरात्रीपासून कलम 144 लागू होणार – डॉ.राजेंद्र...

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा नको, मध्यरात्रीपासून कलम 144 लागू होणार – डॉ.राजेंद्र भारुड

34
0

जीवन महाजन ,

नंदुरबार | कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवार मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करण्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यातदेखील याची अंमलबजावणी करण्यात येणार असून या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहील, त्यात कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

सोमवारी पहाटे पर्यंत नागरिकांना घराबाहेर पडण्यास अनुमती राहणार नाही. त्यानंतरदेखील गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्ह्यात शहरी भागात 144 कलम लागू करण्यात येणार असून 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी असणार नाही. नागरिकांनी एकत्र फिरू नये किंवा एकाच ठिकाणी गर्दी करू नये. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची सेवा आणि बँका सुरू राहतील. बाहेरील वाहनांना जिल्ह्यात प्रवेश असणार नाही. अशावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिसांच्या संपर्कात राहून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल याचे नियोजन करावे. नागरिकांना आवश्यक वस्तू योग्यप्रकारे मिळतील याकडेदेखील विशेष लक्ष देण्यात यावे.नागरिकांनी ‘जनता कर्फ्यू’दरम्यान चांगले सहकार्य केले आहे. विषाणूचा धोका कायमस्वरुपी दूर करण्यासाठी आणखी काही दिवस गर्दी टाळावी लागणार आहे. त्यासाठी नागरिकांनी 23 मार्चपर्यंत बाहेर रस्त्यावर येऊ नये. धार्मिक स्थळाच्या ठिकाणी नेहमीची पूजाअर्चा सुरू राहील, मात्र त्या ठिकाणी नागरिकांना एकत्र येऊ नये. पुढील सुचनेपर्यंत कोणतेही बाजार भरविण्यात येऊ नये. अशा सुचना देण्यात आल्या आहे.

वाहतूक सेवा पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून अथवा परदेशातून आलेल्या नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. ज्या नागरिकांना ‘क्वॉरंटाईन’ करण्यास सांगितले आहे त्यांनी इतरांपासून स्वत:ला दूर ठेवावे आणि बाहेर फिरू नये. पुढील 15 दिवस ही काळजी घेणे महत्वाचे आहे. दुकाने व इतर आस्थापनांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्हा प्रशासनाकडून पूर्णत: खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनदेखील डॉ.भारूड यांनी केले आहे.

नागरिकांचे मानले आभार

जिल्ह्यातील जनतेने स्वंयस्फुर्तीने ‘जनता कर्फ्यू’त सहभाग घेतला. नागरिकांनी 100 टक्के बंद पाळला व कोणीही घराबाहेर आले नाही. करोनाशी लढण्यासाठी नागरिकांची ही एकजूट उपयुक्त ठरेल आणि त्यामुळे विषाणूचा संसर्ग अधिक प्रमाणत होणार नाही. आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या हितासाठी अहोरात्र दक्षता घेत असून नागरिकांचे सहकार्य त्यांना प्रोत्साहन देणारे ठरेल, असे नमूद करून डॉ.भारूड यांनी जिल्ह्यातील विविध संस्था, अधिकारी, कर्मचारी, उद्योजक, व्यावसायिक आणि जनतेला धन्यवाद दिले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागाने परस्परांना या आजाराची माहिती देत सूचनांचे पालन केले, असे त्यांनी म्हटले आहे. येत्या काळातही सर्वांचे प्रशासनास असेच सहकार्य लाभेल, असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Unlimited Reseller Hosting