
कारसह दोन आरोपींना अटक
अब्दुल कय्युम/औरंगाबाद :
कारमधुन तब्बल ४२ किलो गांजाची वाहतूक करणा-या दोन जणांच्या मुसक्या गुन्हे शाखा पोलिसांनी आवळल्या. तर त्यांचे दोन साथीदार पोलिसांच्या हातावर तुर देवून पसार झाले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी २ लाख १० हजार रूपये कींमतीचा ४२ किलो गांजा व एक कार असा एकुण ७ लाख १० हजार रूपये कींमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल अशोक भालेराव (वय २२, रा.मिसारवाडी), सागर छगन खंडागळे (वय २४, रा.कृष्णनगर, आंबेडकरनगर) अशी गाजांची वाहतूक करणारयांची नावे आहेत. तर दिनेश मोकळे (वय १९), अशोक हेमाजी भालेराव (वय ४५, दोघे राहणार मिसारवाडी) अशी पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झालेल्यांची नावे आहेत.
हर्सुल टी पॉईन्ट येथून कार क्रमांक (एमएच-०४-एफआर-३८९५) मधुन तीन जण गांजा घेवून पिसादेवीकडे जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे, सहाय्यक फौजदार शेख नजीर, जमादार चंद्रकांत गवळी, सुधाकर राठोड, सुधाकर मिसाळ, आनंद वाहुळ, सुर्यवंशी आदींच्या पथकाने सापळा रचून २ लाख १० हजार रूपये कींमतीचा ४२ किलो गांजा जप्त केला आहे.