Home महत्वाची बातमी अतिरेक्यांशी झुंजणारे मारोती फड यांना राज्यस्तरीय शौर्यरत्न पुरस्काराने सन्मानित

अतिरेक्यांशी झुंजणारे मारोती फड यांना राज्यस्तरीय शौर्यरत्न पुरस्काराने सन्मानित

242

परळीच्या सुपुत्राला लातूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव…

पुरस्कार माझी नैतिक जबाबदारी वाढविणारा – मारोती फड

सतीश डोंगरे

सातारा , दि. १२ :- मुंबई 26/11 अतिरेकी हल्ल्यातील मुख्य सुत्रधाराशी प्रत्यक्ष झुंजणारे व सध्या सहकार आणि पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचे स्विय सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले मारोती फड यांना आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय “आदर्श शौर्यरत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लातूर येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात मारोती फड यांना सपत्नीक मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी करून परळीचे नाव उंचावल्याबद्दल शौर्यरत्न पुरस्कार प्राप्त मारोती फड यांच्यावर महाराष्ट्रभरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्काराचा मी निमित्य मात्र असुन. हा पुरस्कार नैतिक जबाबदारी वाढविणारा आणि उल्लेखनीय काम करण्याची ऊर्जा मिळवून देणारा असल्याचे मत फड यांनी व्यक्त केले.

लातुर येथील आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या वतीने दयानंद सभागृह लातूर येथे नुकताच पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण व संस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित देशमुख तसेच कार्यक्रमास पाणी पुरवठा व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, आ. विक्रम काळे, लातूर महानगरपालिका महापौर विक्रांत गोजमगुंडे आदींची उपस्थिती होती. दिमाखदार सोहळ्यात मारोती फड यांना राज्यस्तरीय शौर्यरत्न पुरस्कार सन्मानचिन्ह , सन्मान पत्र देऊन सन्मानित करून कार्याचे कौतुक करण्यात आले. आपण धर्मापुरी, ता. परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथे प्रतिकुल परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण केले. मुंबई येथे वाहनचालक म्हणून नौकरी करत असताना २६/११ च्या हल्ल्यात अचानक समोर आलेल्या अतिरेक्याशी शौर्याने मुकाबला करण्याचे धाडस आपण दाखवले. अतिरेक्यासोबत झालेल्या झटापटीत बंदुकीच्या गोळ्यांनी उजव्या हाताची बोटे गमावली, कमरेमध्ये गोळ्या लागल्या, पण आपण डगमगला नाहीत. आपल्याच मुख्य साक्षीने अजमल कसाबला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवले. आपल्या प्रसंगावधानाने व अलौकिक शौर्याने आपण देशभक्तीचा आदर्श समाजासमोर ठेवला. मराठवाडा आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे आपले शौर्य आहे. येणा-या पिढयांना आपल्या कर्तृत्वाचा दीपस्तंभ मार्गदर्शक ठरेल असेच आपले आजवरचे कार्य आहे. आपल्या कार्याला आदर्श मैत्री फाऊंडेशनचा मानाचा मुजरा! आपणास पुढील वाटचालीस व नियोजित कार्यास गती प्राप्त होवो व दीर्घ आयुष्य लाभो, यासाठी आम्ही सदिच्छा व्यक्त करून आपणास हे ‘आदर्श शौर्यरत्न सन्मानपत्र’ आदर आणि कृतज्ञापूर्वक प्रदान करत आहोत. अशा आशयाचे गौरवपत्र प्रदान करण्यात आले.
आपल्या कार्याचा गौरव म्हणुन आपल्याला ‘राज्यस्तरीय शौर्यरत्न पुरस्कार’ प्रदान करताना आम्हाला आनंद होत असल्याचे म्हटले आहे. मारोती फड हे परळी यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर शासकीय सेवेत रुजू झाले. वैद्यकीय क्षेत्रात वाहनचालक या पदावर काम करीत असतांना वैद्यकीय सचिव यांचे ते वाहन चालक होते. मारोती फड 26,/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात तीन गोळ्या लागून जखमी झाले. फड हे या थराराचे साक्षीदार असुन अतिरेक्यांच्या तीन गोळ्या लागुन मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडले. अतिरिक्यांशी धाडसाने तोंड दिलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे वाहनचालक असुनही धैर्याने तोंड दिले. मारोती फड हे सध्या ना. बाळासाहेब पाटील, मंत्री, सहकार, पणन तथा पालकमंत्री, सातारा यांचे स्वीय सहायकपदी कार्यरत आहेत. लातूर येथील आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष सतिष बिराजदार यांनी शौर्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. दरम्यान ना. देशमुख म्हणाले की, देशसेवा करणाऱ्या मारोती फड यांचा देश पातळीवर सन्मान होईल व राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी शिफारस लवकरच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ना. बनसोडे म्हणाले की, फड माझे चांगले मित्र आहेत. मुंबईत मी कार्यकर्ता असल्यापासून त्यांनी खुप मदत केली आहे. व गोरगरिबांना सतत मदत करत असतात असे ते म्हणाले.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना मारोती फड म्हणाले की, या पुरस्कारामुळे माझी सामाजिक जबाबदारी व काम करण्याची नैतिक जबाबदारी वाढली आहे. हा पुरस्कार माझा उत्साह वाढविणारा आहे. मला सकारात्मक ऊर्जा देत माझी प्रेरणा वाढवीत आहेत. या पुरस्काराने आनंद द्विगुणित केला आहे. माझ्या कार्याची दखल घेवून आदर्श फाऊंडेशनचे सतिष बिराजदार यांनी मला सन्मानित केले. ही माझ्यासाठी प्रेरणा असून, भविष्यकाळात सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील आणखी जोमाने काम करण्याची उर्जा मला मिळाली आहे असे मत फड यांनी व्यक्त केले. पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी बीड व लातूर जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने सभागृह फुलून गेले होते. शौर्यरत्न पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल फड यांचे ना.बाळासाहेब पाटील यांच्यासह मोटेगावकर व विविध क्षेत्रातील उद्योजक तसेच बीड, परळी तालुक्यातील शासकीय, पत्रकार, क्रिडाप्रेमी, शैक्षणीक, सामाजिक, राजकीय व शेतकरी बांधव तथा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व विविध क्षेञातील मान्यवर, मित्र परिवार व नातेवाईकांकडून मारोती फड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.