Home विदर्भ वृध्द आईचा खुन , “आरोपीस जन्मठेपेची शिक्षा”

वृध्द आईचा खुन , “आरोपीस जन्मठेपेची शिक्षा”

80
0

रवि माळवी

यवतमाळ , दि. ११ :- दारु पिण्यासाठी मुलाने आईला पैसे मागीतले असता ते न देण्याच्या कारणावरुन तिच्या सोबत वाद करुन हातातील दगडी खलबत्ता आईच्या डोक्यावर मारल्याने ति रक्ताच्या थारोळ्यात कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दिनांक २/९/२०१८ रोजी अवधुतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुरुनानकनगर गोधणीरोड येथे घडली होती. प्रकरणी आरोपी मुलाला अटक करुन त्याच्याविरुध्द अवधुतवाडी पोलीस स्टेशनला भादंवि ३०२, २०१, ५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज दिनांक ११/३/२०२० रोजी सदर खटल्याचा निकाल वि.श्री.पेटकर साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यवतमाळ यांनी देवून आरोपीस जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे.
कैलास नारायण उईके (३७) रा. गुरुनानकनगर असे आरोपीचे नाव आहे. आरोपी कैलास उईके हा त्याची आई मृतक सौ.शांताबाई नारायण उईके (६०) वर्षे हिला दारु पिण्याकरीता पैसे मागत होता. त्यावरु मृतक शांताबाई हिने दारु पिण्या करीता पैसे नाही असे सांगीतले. त्यावर आरोपी तु पैसे दिले नाही तर तुला खतम करुन टाकतो असे म्हणून मृतक शांताबाई हिचेसोबत वाद करु लागला तेव्हा आरोपीने दुसरे खोलीत पडून असलेला खलबत्ता उचलला व फिर्यादीचे अंगावर मारण्यास धावला तेव्हा ती आपला जिव वाचविण्याकरीता घराचे दारामागे लपली. तेव्हा आरोपीने त्याचे हातातील दगडी खलबत्ता मृतक शांताबाई हिचे डोक्यात मारला. तेव्ही ति रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागेवरच मरण पावली. तेव्हा फिर्यादी सौ.चेतना मंगेश उईके हिने आरडाओरड केली असता शेजारील लोक घटनास्थळी धावून आले. आरोपीने खलबत्ता व त्याचे अंगावरील रक्ताने माखलेले कपडे एका थैलीमध्ये टाकून बाजोरीया नगर मधील प्राथमिक शाळैत लपवून ठेवले व तेथून पळून गेला. सौ.चेतना मंगेश ईके हिने तिचे पतीला फोनवरुन सदर घटनेची माहिती दिली. पती घरी आल्यानंतर फिर्यादी सौ.चेतना उईके हिने सदर घटनेची तक्रार अवधुतवाडी पोलीस स्टेशनला दिली असता आरोपीविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.पि.बारापात्रे, पोलीस स्टेशन अवधुतवाडी यांनी करुन तपासाअंती आरोपीविरुध्द वि.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर खटला वि.श्री.पेटकर साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यवतमाळ येथे से.के.क्रमांक एस.टी.क्र.१०५/१९ प्रमाणे सुनावणी करीता सुरु असतांना वि.श्री.पेटकर साहेब, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश यवतमाळ यांनी दिनांक ११/३/२०२० रोजी सदर खटल्याचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये वि.न्यायालयाने आरोपी कैलास उईके याला दोषी ठरवत भादंवि कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास तसेच कलम ५०६ अंतर्गत ५ वर्षे सक्त मजूरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर प्रकरणात सरकार तर्फे ए.पी.पी.श्री.अरुण मोहोड यांनी काम पाहीले तर, सफौ/१७७८ दिनकर चौधरी पोलीस स्टेशन अवधुतवाडी यांनी कोर्ट पेरवी म्हणून काम पाहीले.