सय्यद नजाकत
जालना – शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काशिनाथ बाविस्कर असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. एकीकडे होळीचा सण उत्साहात साजरा होत असताना जिल्ह्यातल्या देहेड गावात मात्र शोककळा पसरली आहे. भोकरदन तालुक्यातील देहेड गावातील काशिनाथ बाविस्कर हे रोजच्या प्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. दरम्यान खुप वेळ झाला असल्याने आपले पती शेतातून घरी का येत नाही म्हणून बाविस्कर यांच्या पत्नीने त्यांना फोन केला. अनेक वेळा कॉल करूनही फोन उचलत नसल्याने गावातील काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहिले असता काशिनाथ बाविस्कर यांचा मृतदेह विजेच्या खांबाजवळ आढळून आला. सणावाराच्या दिवशीच काळाने बाविस्कर कुटुंबीयावर घाला घातल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केल्या जात आहे.