Home मुंबई पतीने चाकूने भोसकून केली पत्नीची हत्या

पतीने चाकूने भोसकून केली पत्नीची हत्या

17
0

अमीन शाह

मुंबई – मुंबईच्या चेंबूर भागात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने मोबाइल देण्यास नकार दिल्याने पतीने तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. या संपूर्ण घटनेबाबत आज (सोमवार) पोलिसांनी ही माहिती दिली. रविवारी रात्री एमएचएडीसी कॉलनीतील कुर्रैया कुटुंबीयांच्या घरी ही घटना घडली. जेव्हा आरोपी जेम्स जॉन कुर्रैया (वय ५१) हा रात्री दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने आपल्या ४५ वर्षीय पत्नीकडून मोबाइल मागितला तेव्हा त्यांच्यात टोकचे वाद झाले. याच वादादरम्यान, पतीने पत्नीची हत्या केली.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने तिचा मोबाइल फोन न दिल्याने पतीने सुरुवातीला तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाद आणखी वाढल्याने पतीने स्वयंपाकघरातील चाकूने तिच्यावर अचानक हल्ला चढवला. त्यानंतर त्याने पत्नीवर अनेक वार केले. ज्यामध्ये त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पत्नीचा मृत्यू झाल्याचं समजताच आरोपी पतीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण काही शेजार्‍यांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी त्याला पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केलं.

आरसीएफ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सोपान निगहोट यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती देताना असं सांगितले की, ‘आम्ही आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.