Home विदर्भ 13 नवीन शासकीय इमारती बांधकामासाठी सुमारे साडेतीनशे कोटी निधीला मंजुरी अद्ययावत सुविधांसह...

13 नवीन शासकीय इमारती बांधकामासाठी सुमारे साडेतीनशे कोटी निधीला मंजुरी अद्ययावत सुविधांसह प्रशस्त इमारती – पालकमंत्री यशोमती ठाकूर

22
0

मनिष गुडधे

अमरावती , दि. ०८ :- जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयांच्या 13 नवीन शासकीय इमारती उभारण्यासाठी सुमारे 363.85 कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली असून आता टप्प्या टप्प्याने निधी वितरीत करुन या इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे.
पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी या इमारतींचा प्रस्ताव मिशनमोडवर तयार करण्याचे निर्देश दिले होते व त्यानुसार प्रशासनाची बैठक घेऊन विविध सूचना केल्या व शासनाकडे पाठपुरावा केला. राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी या इमारतींच्या बांधकामाला मंजुरी दिली. त्यामुळे इमारतीचे काम लवकरच सुरू होणार आहे.
शहरातील विभागीय महसूल आयुक्तालय परिसरात सेंट्रल बिल्डिंग, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतींचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले. भातकुली, अमरावती, चिखलदरा, धारणी व दर्यापूर पंचायत समितीकरिता नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा प्रस्तावसुध्दा बनविण्यात आला. यासाठी 2020-21 च्या अर्थसंकल्पात एकुण 363 कोटी 85 लाख रुपयांची तरतुद करण्यात आली. मोठी आर्थिक तरतूद करण्यात आल्याने शासकीय कार्यालयांना अत्याधुनिक प्रशासकीय इमारती मिळणार आहेत़
जिल्ह्यातील बहुतांश इमारती भाड्याच्या इमारतीमध्ये असल्याचे, तसेच उर्वरित इमारती ब्रिटीशकालीन असल्याने नव्या इमारतींची गरज असल्याचे पालकमंत्री श्रीमती ठाकूर वित्तमंत्री श्री. पवार यांच्या निदर्शनास आणले. त्यानुसार वित्तमंत्री यांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
पालकमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम नकाशे व खर्च याबाबतचे प्रस्ताव तयार केले. त्याला मंजुरी मिळाल्याने अमरावतीच्या स्थापत्य वैभवात भर पडणार आहे.

अर्थसंकल्पात प्रस्तावित प्रशासकिय इमारती व खर्च
इमारत खर्च (कोटींमध्ये)
सेंट्रल बिल्डिंग 89.93
जिल्हा मध्यवर्ती कार्यालय 72.79
जिल्हा परिषद कार्यालय 42.29
जिल्हाधिकारी कार्यालय 42.44
अमरावती मनपा भवन 38.00
अम. तहसील व एसडीओ 28.91
मोझरी विश्रामगृह विस्तारीकरण 2.00
तिवसा विश्रामगृह विस्तारीकरण 2.11
भातकुली पंस भवन 6.01
अमरावती पंस भवन 6.01
चिखलदरा पंस सभागृह 1.34
धारणी पंस भवन 14.25
दर्यापुर पंस भवन 5.67