Home मराठवाडा मराठवाड्याच्या प्रलंबित विकास कामांना गती देणार – पालकमंत्री अशोक चव्हाण

मराठवाड्याच्या प्रलंबित विकास कामांना गती देणार – पालकमंत्री अशोक चव्हाण

80
0

नांदेड, दि. २ ; ( राजेश भांगे ) :- मराठवाड्यातील रस्त्याची कामे, पाणी पुरवठा योजनेसह प्रलंबित विकास कामांना गती देणार असल्याचे, प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
भोकर तालुक्यातील साळवाडी येथे श्री संत गाडगेबाबा प्रतिष्ठाण नांदेडद्वारा संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा साळवाडी रौप्यमहोत्सवी वर्षे समारंभ आयोजित कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री श्री. चव्हाण बोलत होते.
यावेळी आमदार अमर राजूरकर, माजी आमदार महाराष्ट्र ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, महाराष्ट्र जिल्हा परिषद संघटनेचे अरुण खरमोटे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी बापुराव गजभारे, महाराष्ट्र ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समितीचे कोषाध्यक्ष जे.डी. तांडेल, श्री. संत गाडगेबाबा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बालाजी शिंदे, सेवाश्रम आदिवासी आश्रम शाळा साळवाडीचे मुख्याध्यापक माधव शिंदे, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक संजीव येचाळे, गोविंदराव नागेलीकर आदि मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन प्रयत्नशील असून आदिवासी समाजाच्या विकासात्मक व व्यक्तीगत योजना राबविण्याचा प्रयत्न शासन करत आहे. भोकर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बंधारे, तळे बनविण्यात येणार आहेत. भोकरचे रस्ते, वाहतुकीची सुविधाही उपलब्ध होतील यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. ओबीसी वसतिगृहाच्या जागेबाबतचा प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले. नारवट ते पांडूर्णा पाच किमीचा रस्ताचे काम लवकर हाती घेण्यात येणार आहे. आश्रम शाळेत संगणकासाठी 5 लक्ष देण्यात येतील, असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करुन मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविका संस्थेचे अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी केले. यावेळी नागरिक, विद्यार्थी, आदी बहुसंख्येने उपस्थित होते.