Home सातारा भारताला महासत्तेकडे जायचे असेल तर येणारी प्रत्येक पिढी विज्ञानिष्ठच झाली पाहिजे –...

भारताला महासत्तेकडे जायचे असेल तर येणारी प्रत्येक पिढी विज्ञानिष्ठच झाली पाहिजे – प्राचार्य सचिन पाटील

68
0

महिला आणि विज्ञान हे यावर्षीच्या विज्ञान दिनाचे ब्रीदवाक्य आहे – प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी

मायणी / सातारा – (सतीश डोंगरे): “नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक डॉ. सी. व्ही. रमण यांनी जगाला विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. आज विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे कल वाढलेला आहे, परंतु दिवसेंदिवस वैज्ञानिक दृष्टिकोन कमी होत चालला आहे. भारताला महासत्तेकडे जायचे असेल तर येणारी प्रत्येक पिढी विज्ञानिष्ठच झाली पाहिजे, ” असे प्रतिपादन प्राचार्य सचिन पाटील यांनी केले. ते येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी होते.

प्रारंभी प्रा. कालिदास सरकाळे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी ‘युवास्पंदन’ भित्तिपत्रकाच्या विज्ञान विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. भित्तिपत्रकाच्या माध्यमातून कोरोना विषाणूबद्दल शास्त्रीय माहिती देण्यात आली. यावेळी डॉ. विजया कदम, प्रा. भाग्यश्री फडतरे, प्रा. मगर, प्रा. दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी म्हणाले, “महिला आणि विज्ञान हे यावर्षीच्या विज्ञान दिनाचे ब्रीदवाक्य आहे. महिला सतत कार्यमग्न असतात. त्यांच्या कामकाजाचे स्वतंत्र शास्त्र असते. त्यांच्या कामाचा सन्मान झाला पाहिजे. विज्ञानाने मानवी जीवनातील कष्टप्रद भाग कमी केला आहे. मात्र विज्ञानाने मानवासमोर नवी आव्हाने उभी केली आहेत. विज्ञानाला नीतीची जोड असल्याशिवाय विज्ञान समाज उपयोगी ठरत नाही. शोधांचा वापर स्वार्थासाठी केल्यास तो मानवजातीसाठी घातक ठरतो, हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी विज्ञानासोबतच संस्कार आणि नीतिमत्ता जपली पाहिजे.”
आभार प्रदर्शन प्रा. शिवशंकर माळी यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पायल भिसे हिने केले.