Home रायगड तमनाथचे तमनाथेश्वर स्वयंभू शिवमंदिर

तमनाथचे तमनाथेश्वर स्वयंभू शिवमंदिर

135
0

कर्जत – जयेश जाधव

कर्जत शहरापासून ६ किमी अंतरावर निसर्गाचे वरदान लाभलेल्या परिसरात तमनाथ या गावामध्ये श्री तमनाथेश्वरांचे स्वयंभू व प्राचीन मंदिर असून मंदिराची उभारणी पांडव काळात करण्यात आली असल्याची माहिती येथील ग्रामस्थ देतात.

या मंदिराला रेखीव दगडाचा गाभारा आहे. तर गाभाऱ्याला गोल गोल घुमटाकार कळस असून गाभाऱ्याच्या बाहेर कमानीला गणपती व शंकर पार्वतीच्या मुर्ती कोरलेल्या आहेत तसेच या मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.१६ व्या शतकात मोगल व आदिलशाही महाराष्ट्रावर अनेक अतिक्रमणे होत.

त्यामध्ये हिंदुची श्रध्दास्थान असणारी मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती म्हणून या परकिय आक्रमणापासून मंदिरांचे संरक्षण करण्यासाठी राजमाचीकर यांनी या मंदिराला घराचे स्वरूप दिले होते.हे मंदिर उल्हास नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असून मंदिराच्या पुर्वेकडे संत चोखोबांचे मंदिर आहे.तमनाथेश्वरांच्या मंदिरात सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात असते.या दिवशी जोशी भाऊबंध एकत्र येऊन सकाळी श्री महारुद्रा भिषेक करतात तसेच यात्रेत २५ गाव वासरे खोंड्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या देवस्थानाची दैनंदिन पूजाअर्चा येथील गुरव कुटूंबीय करतात. त्याबद्दल गुरव घराण्याला जमीन कसण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
मात्र महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी गुरव कुटूंबीय संपूर्ण गावाला महाप्रसाद देतात.ही पुरातन प्रथा आहे तर त्याचप्रमाणे या वासरे खोंड्यातुन मार्गशीर्ष महिन्यातुन देहू आळंदीकडे,प्रस्थान करणारी वारकरी संप्रदायातील दिंडी या मंदिरात महाप्रसाद घेऊनच पुढे जात असल्याने या मंदिराला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे या प्राचीन देवस्थानाचे दैनंदिन कारभार व्यवस्थापनासाठी शंकर मंदिर देवस्थान ट्रस्ट स्थापन करण्यात आली असून त्याचे अध्यक्ष संतोषशेठ भोईर, उपाध्यक्षा मंगला राजमाचीकर , सदस्या अरूणा संतोष भोईर, रामचंद्र विष्णू भोईर, चिटणीस श्रीराम सिताराम भालिवडे आदी कार्यरत आहे.