Home यवतमाळ नागपूर उच्च न्यायालयाच्या वकील महिलेवर भरदिवसा चाकूने जीवघेणा हल्ला….!

नागपूर उच्च न्यायालयाच्या वकील महिलेवर भरदिवसा चाकूने जीवघेणा हल्ला….!

829

केस मागे घेण्याची धमकी

वणी – नागपूर हायकोर्टात वकिली प्रॅक्टीस करणाऱ्या एका महिला वकिलावर भरदिवसा चाकूने हल्ला तसेच विनयभंग केल्याची तक्रारीवरून वेस्टर्न कोलफील्ड खाणीत युनियन लीडर असलेल्या व्यक्तीविरुद्ध यवतमाळ जिल्ह्यातील तालुका वणी मधील शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील भाऊराव मोहितकर (55), रा. जैन लेआऊट, वणी असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार एडवोकेट सोनिया गजभिये (42), रा. भालर टाउनशिप, वणी या हायकोर्ट नागपूर येथे वकिली करत असून “भीमराज की बेटी” या संघटनेमार्फत महिला सक्षमीकरणासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी एका महिला पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करण्यास मदत केली होती. याच कारणावरून आरोपी सुनील भाऊराव मोहितकर हा तिच्यावर सूडभावना ठेवून होता.
दि. 17 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता तक्रारदार एडवोकेट गजभिये आपल्या दोन वर्षांच्या मुलीला घरासमोर फिरवत असताना आरोपी अचानक तिच्या समोर आला आणि त्याने चाकूने 2 ते 3 वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच अश्लील शिवीगाळ करत केस मागे घेण्याची धमकी दिली. स्वतःचा बचाव करताना गजभिये यांनी आरोपीचा प्रतिकार केला. या झटापटीत तिच्या हाताला मोठी दुखापत झाली. आरोपीने तिची ओढणी ओढत खाली पाडून पुन्हा धमक्या दिल्या. दरम्यान, परिसरात वाहनाचा आवाज ऐकून आरोपी तेथून पळून गेला. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सदर घटनेनंतर गजभिये यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे . त्यांच्या तक्रारीवरून आरोपी सुनील मोहितकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ( BNS ) कलम 118(1), 74, 352, 351 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस करत असून आरोपीचा शोध सुरु आहे तसेच या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.