Home वाशिम पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात पतीला जन्मठेप ,

पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात पतीला जन्मठेप ,

153

 

चरित्रावर संशय घेत केली पत्नीची हत्या
मंगरुळपीर तालुक्यातील मानोली येथील घटना

फुलचंद भगत
वाशिम:-पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात ग्राम मानोली येथील आरोपी रोशन विजय उगले याला सत्र न्यायाधीश मंगरुळपीर वैभव पाटील यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ प्रमाणे आजन्म कारावास (जन्मठेप) व रू. १०,०००/- द्रव्यदंड, आणि द्रव्यदंड भरण्यात कसूर केल्यास १ वर्ष अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा दिनांक ०५ मार्च रोजी खुल्या न्यायालयात सुनावली.
सविस्तर वृत्त असे आहे की, फिर्यादी श्रीकृष्ण तुळशिराम वाकोडे, रा. आरखेड ह्यांनी दिनांक १० एप्रील २०२१ रोजी फिर्याद दिली की, फिर्यादीची चुलत पुतणी नामे रिना वय २० वर्ष हिचे लग्न दि. २९/०७/२०२० रोजी ग्राम मानोली, ता. मंगरूळपीर जि वाशिम येथील रोशन विजय उगले याचे सोबत समाजाचे रितीरिवाजाप्रमाणे झाले.लग्न झाल्यावर सुरूवातीस काही दिवस रिना हिला तिचे पती रोशन विजय उगले याने चांगले वागविले त्यानंतर दस-याचे वेळेस रोशन विजय उगले याने रिना हिला ग्राम आरखेड येथे माहेरी आणुन सोडले व सांगितले की त्याला रिनाला वागवायचे नाही त्यामुळे रिनाला काय झाले असे विचारले असता तिने सांगितले होते की तिचा नवरा रोशन उगले हा नेहमी तिच्या चारित्र्यांवर संशय घेतो व तिला शिवीगाळ करून मारहाण करतो, तसेच तिला घरी बोलण्यासाठी फोन मागीतला असता फोनसुद्धा देत नाही असे सांगितले. त्यानंतर अंदाजे पंधरा ते विस दिवसानी आम्ही नातेवाईकानी मध्यस्थी करून त्यांना समजावुन सांगितले. त्यानंतर रोशन विजय उगले हा रिनाल वागवायास घेवुन गेला .

त्यानंतर दि. १०/०४/२०२१ रोजी मला दुपारी ०३/०० वा दरम्यान , रिना हिची तब्येत खराब आहे, तुम्ही लवकर या असे सांगितले त्यामुळे रिनाची आई अंजु दिनेश वाकोडे व इतर नातेवाईक असें मानोली येथे आले.त्यानंतर समजले की, रोशन विजय उगले याने पुतणी रिना हिला लोखंडी पाईपाने डोक्यावर, डोळयावर, गळयावर मारहाण केली व तिचे डोके फरशीवर आपटून रीनाला जीवे मारले आहे. त्यामुळे आरोपी रोशन उगले ह्याचे विरूदध कायदेशीर कार्यवाही व्हावी.फिर्यादीच्या रिपोर्ट वरुन आरोपी रोशन उगले याचे विरुध्द दिनांक १०.०४.२०२१ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंदवन्यात आला होता. सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करून व तपास करून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, निलेश शेंबडे, यांनी मंगरूळपीर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपी रोशन विजय उगले याचे विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर आरोपी हा गुन्हा घडल्या पासुन जिल्हा कारागृहात बंदिस्त होता, त्याला न्यायालयाने खटला निकाली निघेपर्यंत जामीन मंजूर केला नव्हता.सदर सत्र खटल्यामध्ये आरोपी रोशन विजय उगले ह्याचेवरील गुन्हा सिद्ध करणे करिता अतिरिक्त शासकीय अभियोक्ता जी. डी. गंगावणे यांनी न्यायालयात सरकार पक्षातर्फे एकूण २१ साक्षीदार यांची साक्ष नोंदवली.
सदर सत्र खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आरोपीचा पुतण्या ओंम समाधान उगले, आरोपीचा चुलत भाऊ किसण उर्फ कृष्णा श्रीराम उगले, आरोपीची काकू लताबाई श्रीराम उगले व आरोपीचा शेजारी वसंता कुंडलीक राऊत हे न्यायालयात पूर्णपणे फितूर झाले होते. तसेच पंचनाम्यावरील साक्षदार सुलोचना श्रीराम अंबाडे व नामदेव कळनुजी भगत हेसुद्धा पूर्णपणे फितूर झाले होते. परंतु न्यायालयाने उर्वरित साक्षदार श्रीकृष्ण तुळशिराम वाकोडे, अंजु दिनेश वाकोडे, निकेश गावंडे, अशोक नारायण महाकाळ, ई. साक्षादर तसेच वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी, व इतर महत्वाचे साक्षदार रासायनिक विश्लेषक, न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा अमरावती अभिषेक तडे व पंकज हुलवान तसेच नोडल अधिकारी आयडिया-ओडाफोन व रिलायन्स जिओ टेलिकॉम ह्यांची साक्ष ग्राह्य धरून व परिस्थितीजन्य पुरव्यावरून व रासायनिक पुराव्यावरून आरोपी रोशन विजय उगले रा. मानोली ह्याला त्याची पत्नी रिना हिच्या खुनाच्या गुन्ह्यात दोषसिद्धी झाल्यामुळे मंगरूळपीर येथील वि. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वैभव व्ही. पाटील , यांनी दिनांक ०५. मार्च रोजी आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ प्रमाणे आजन्म कारावास (जन्मठेप) व रू. १०,०००/- द्रव्यदंड, आणि द्रव्यदंड भरण्यात कसूर केल्यास १ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा खुल्या न्यायालयात सुनावली.

सदर सत्र खटल्यात महाराष्ट्र शासनातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता, गोवर्धन गंगावणे, यांनी बाजू मांडली,प्रभारी अधिकारी मंगरुळपीरचे ठाणेदार किशोर शेळके तसेच सदर सत्र खटल्यात कोर्ट पैरवी म्हणून अगोदर एल.पी.सी. सुवर्णा मनवर, ब. नं. ९०१ व नंतर पोलिस हवालदार राम नागूलकर, ब. नं. १००४ यांनी आरोपीच्या दोष सिद्धी करिता अतिरिक्त शासकीय अभियोक्ता यांना पैरवी म्हणून मदत केली.