Home यवतमाळ प्रफुल्ल भोयर यांना ‘छत्रपती संभाजी राजे युवा पुरस्कार’ प्रदान

प्रफुल्ल भोयर यांना ‘छत्रपती संभाजी राजे युवा पुरस्कार’ प्रदान

151

◆ यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा; मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा संपन्न

यवतमाळ: सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, यवतमाळ यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मानाचा “छत्रपती संभाजी राजे युवा पुरस्कार २०२६” तरुण समाजसेवक व लेखक प्रफुल्ल नंदा गणपतराव भोयर यांना प्रदान करण्यात आला. छत्रपती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अत्यंत उत्साही आणि दिमाखदार वातावरणात हा गौरव सोहळा पार पडला. प्रफुल्ल भोयर यांनी समाजसेवा, पर्यावरण संरक्षण, साहित्य निर्मिती आणि कायदा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तरुणांना दिशा देण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले. विविध मोहिमांच्या माध्यमातून निसर्ग रक्षणाचा संदेश दिला. सामाजिक प्रश्नांवर लेखन करून जनजागृती केली. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन समितीने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. यवतमाळ शहरासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे.
शिवतीर्थ परिसरात पार पडलेल्या या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध पत्रकार व राजकीय विश्लेषक अशोक वानखडे, नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके, मराठा सेवा संघाचे ज्ञानेश्वर गायकवाड (अध्यक्ष), प्रदीप वादाफळे (स्वागताध्यक्ष), आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील उपस्थित होते.
याव्यतिरिक्त वसंत घुईखेडकर, वैशाली सवई, राजेंद्र गायकवाड, नितीन खर्चे, रवी ढोक, शशिकांत खडसे, कीर्ती राऊत, विद्या खडसे यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक या सोहळ्याचे साक्षीदार झाले.
“प्रफुल्ल भोयर यांच्या कार्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशाने यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.”