Home यवतमाळ वणीतील कोळसा हेराफेरी प्रकरणाचा तपास एलसीबीकडे द्यावा – नागरिकांची ठाम मागणी

वणीतील कोळसा हेराफेरी प्रकरणाचा तपास एलसीबीकडे द्यावा – नागरिकांची ठाम मागणी

289
♦️*कोळसा हेराफेरी प्रकरणाचा तपास एलसीबीकडे द्या; पोलीस अधीक्षकांकडे नागरिकांची ठाम मागणी*
♦️*उकणी वेकोलीतील कोळसा घोटाळ्यावर संशयाचे सावट; निष्पक्ष चौकशीसाठी एलसीबीची मागणी जोरात*
♦️*ट्रक चालकांवर गुन्हा, पण सूत्रधार कोण? संपूर्ण तपास एलसीबीकडे देण्याची मागणी तीव्र*
वेकोली उकणी कोळसा खाणीतून रेल्वे साइडिंगसाठी रवाना झालेल्या दोन ट्रकमधील कोळसा हेराफेरी प्रकरणाचा तपास स्थानिक पातळीवर न ठेवता तो थेट एलसीबी (लोकल क्राईम ब्रँच) पथकाकडे सोपवावा, अशी ठाम मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून होत आहे. या गंभीर प्रकरणात मोठे मासे सहभागी असल्याची चर्चा रंगत असल्याने पोलीस अधीक्षकांनी स्वतः हस्तक्षेप करून तपास एलसीबीकडे द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
घटनेनुसार, (वेकोली) उकणी खाणीतून भरलेला मूळ कोळसा यवतमाळ मार्गावरील रामदेवबाबा मंदिराजवळील खासगी कोळसा प्लॉटवर उतरवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर कोल वॉशरी परिसरातील दुसऱ्या प्लॉटवरून बेड मटेरियल भरून संबंधित ट्रक रेल्वे साइडिंगवर नेण्यात आल्याचा आरोप आहे.
घटना उघडकीस आल्यानंतर तब्बल ४८ तासांनी वणी पोलीस ठाण्यात दोन्ही ट्रक चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या विलंबामुळे आणि संपूर्ण प्रकरणातील संशयास्पद हालचालींमुळे तपासाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षा देखरेखीखाली असतानाही दोन्ही चालक रात्रीच्या वेळी फरार झाल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे कोळसा पुरवठा व्यवस्थेतील संभाव्य गैरव्यवहार, प्रशासनिक जबाबदारी आणि राजकीय हस्तक्षेप याबाबत चर्चा रंगत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि दबावमुक्त चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तपासाची सूत्रे एलसीबी पथकाकडे सोपवावीत, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. निष्पक्ष चौकशीसाठी तपास एलसीबीकडे देणे हाच योग्य पर्याय असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.