Home यवतमाळ धानोरा प्रकरणी चौकशी समिती गठीत

धानोरा प्रकरणी चौकशी समिती गठीत

271

– घरकुल, सीसी रोड व शौचालय कामांतील अनियमिततेच्या तक्रारींवर जिल्हा परिषदेची कारवाई

उमरखेड : मौजे धानोरा (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील विविध शासकीय योजनांमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने चौकशी समिती गठीत केली आहे. जीप यवतमाळ अंतर्गत पंचायत समिती उमरखेड येथे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.
संयुक्त पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य (उमरखेड) पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सीसी रोड कामे तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकामामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
समितीची रचना
प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीत श्री. विजयकुमार खिल्लारे – सहाय्यक गट विकास अधिकारी (समिती प्रमुख)
श्री. सुरेश चव्हाण – विस्तार अधिकारी (सचिव)
श्री. अमोल जाधव – शाखा अभियंता (सदस्य)
श्री. यवराज देशमुख – विस्तार अधिकारी (सांख्यिकी) (सदस्य)
श्री. महेंद्र गुल्हाणे – समाजशास्त्रज्ञ, पाणी व स्वच्छता विभाग (सदस्य) यांचा समावेश आहे.
सदर समितीस संबंधित कामांची कागदपत्रे, मोजमाप नोंदी व आर्थिक तपशीलांची पडताळणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तक्रारींमध्ये सीसी रोडचे काम अपूर्ण ठेवून बिल अदा केल्याचा आरोप, घरकुल योजनेतील निधी वितरणाबाबत आक्षेप, तसेच सार्वजनिक शौचालय बांधकामाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे. या अनुषंगाने वस्तुनिष्ठ व पारदर्शक चौकशी होऊन सत्य परिस्थिती समोर यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, चौकशी अहवालानंतरच पुढील प्रशासकीय कारवाई होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. गावातील नागरिकांचे लक्ष आता समितीच्या अहवालाकडे लागले आहे.