Home विदर्भ दिवसाढवळ्या चालते गुटका व सुगंधी तंबाखूची तस्करी…..

दिवसाढवळ्या चालते गुटका व सुगंधी तंबाखूची तस्करी…..

474

वर्धा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात गुटखा व सुगंधी तंबाखूचे मोठे गोदाम…..

वर्ध्यात गुटखा तस्करी करणाऱ्यांनी येथे मोठे गोदाम तयार केले असल्याची माहिती आहे. या गोदामात इतर जिल्ह्यातून व राज्यातून येणारी वाहने दिवसाढवळ्या रिकामी करण्यात येतात. त्यानंतर छोट्या वाहनांमध्ये भरून त्या मालाची विल्हेवाट लावण्यात येते. त्यासाठी वर्ध्यातील शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परिसरात या गोदामांचा वापर करण्यात येतो.

राज्यात गुटखा बंदी झाली असतानाही वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक पानटपरीवर गुटखा आणि सुगंधी तंबाखूची खुलेआम विक्री करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी करण्यात येत असून, वर्धा येथील सोनू आणि धामणगाव येथील मधू या दोघांच्या इशाऱ्यावर गुटखा तस्करीचा हा संपूर्ण खेळ चालवण्यात येत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या संदर्भात संबंधित सर्व विभागांना माहिती असतानाही कारवाई करण्यासाठी कुणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही.
जिल्ह्यात एकीकडे तंबाखू संदर्भात अनेक सामाजिक संस्था, शाळकरी मुलांकडून जनजागृती रॅली काढण्यात येते. मात्र दुसरीकडे गुटख्यासह सुगंधी तंबाखूची सर्रास विक्री सुरु आहे. परिणामी लहान मुलांनाही तंबाखूचे व्यसन लागले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
शासनाकडून सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आले असले तरी जिल्ह्यात तंबाखू बंदी कायदा कुचकामी ठरत आहे. पान टपर्‍यांवर 18 वर्षाखालील मुलांनी तंबाखू विकत घेणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु शहरासह ग्रामीण भागात अनेक दुकानांवर अशा मुलांना गुटखा खरेदी करताना पाहता येते. शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे हा गुन्हा आहे. शैक्षणिक संस्थांच्या प्रभारींनी प्रत्येक प्रवेशद्वारावर तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था, या शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्डाच्या आत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे गुन्हा आहे, असे फलक लावणे आवश्यक आहे. मात्र, अनेक शाळांच्या मुख्य प्रवेशद्वारावरील हे फलकच बेपत्ता झाल्याचे दिसते. दुसरीकडे पानटपरी चालक गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू विक्री करुन किशोरवयीन मुलांना आजाराच्या गर्तेत ढकलत आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात अनेक महिलाही गुटख्याच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. तेव्हा प्रशासनाकडून कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.