Home यवतमाळ यवतमाळच्या अदिबा अनम अश्फाक अहमद हिचा UPSC 2024 मध्ये ऐतिहासिक यश

यवतमाळच्या अदिबा अनम अश्फाक अहमद हिचा UPSC 2024 मध्ये ऐतिहासिक यश

1867

संपूर्ण देशातून 142 वी रँक, महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम IAS अधिकारी होण्याची शक्यता

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) 2024 चा अंतिम निकाल आज जाहीर झाला असून, महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्याची अदिबा अनम अश्फाक अहमद हिने संपूर्ण देशातून 142 वी रँक पटकावून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे ती महाराष्ट्रातील पहिली महिला मुस्लिम IAS अधिकारी होण्याची दाट शक्यता आहे.

अदिबा यापूर्वी देखील UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीपर्यंत पोहोचली होती, मात्र अंतिम यादीत तिची निवड झाली नव्हती. मात्र चिकाटी, सातत्य आणि कठोर मेहनतीच्या जोरावर तिने यावर्षी अंतिम यादीत स्थान मिळवले असून, हे यश तिच्या जिद्दीचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

अदिबा हज हाऊस IAS प्रशिक्षण संस्था आणि नंतर दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या निवासी प्रशिक्षण केंद्राची विद्यार्थिनी होती. या प्रशिक्षण संस्थांमधून तिला मिळालेल्या मार्गदर्शनाचा आणि अभ्यासाच्या योग्य दिशा मिळाल्याचा तिला मोठा फायदा झाला, असे ती म्हणते.

अदिबाचे शिक्षण आणि तिच्या जडणघडणीचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींसाठी तिची ही वाटचाल प्रेरणास्थान ठरेल. जिथे अनेक अडथळे, सामाजिक बंधनं आणि आर्थिक अडचणी असतात, तिथून पुढे येऊन UPSC सारखी स्पर्धा जिंकणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

तिच्या या यशाबद्दल राज्यभरातून आणि देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि शिक्षकवर्गाने तिच्या या कामगिरीला सलाम केला आहे.

हार्दिक अभिनंदन अदिबा अनम अश्फाक अहमद! तुझ्या यशामध्ये अनेक स्वप्नं रुजली आहेत. भविष्यातील प्रशासकीय सेवेसाठी तुला मनःपूर्वक शुभेच्छा!