Home वाशिम राशनच्या गहू-तांदुळाचा ‘काळाबाजार’ करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई ; आरोपीसह ०९.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

राशनच्या गहू-तांदुळाचा ‘काळाबाजार’ करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई ; आरोपीसह ०९.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

97

वाशिम:-दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची काळाबाजारी, साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. त्यामुळे महागाई वाढून त्याचा जनसामान्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. अश्याप्रकारचा जीवनावश्यक वस्तूंचा गैरप्रकार तसेच काळाबाजार रोखण्यासाठी साठेबाजी/काळाबाजारी करणाऱ्यांविरोधात मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ नुसार कारवाया करण्यात येत आहेत.

त्या पार्श्वभूमीवर दि.०३.०२.२०२३ रोजी पो.स्टे.कारंजा ग्रामीण हद्दीतील ग्राम तपोवन येथील शेत शिवारात एक इसम जीवनावश्यक धान्य राशनचे गहू तांदुळाचा साठा करून काळाबाजारी करत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी,कारंजा श्री.जगदीश पांडे यांनी पथकासह तेथे पंचासमक्ष छापा टाकला असता ग्राम तपोवन येथील शेत शिवारात एका शेतात तीन इसम नामे सलीम भिकाजी बाळापुरे, अलीम सलीम गुंगीवाले, तोहीद हसन भवानिवाले यांच्या ताब्यात अवैध विनापरवाना शासकीय स्वस्त धान्य दुकानात वितरीत करण्यात येत असलेला गहू-तांदळाचा साठा चारचाकी वाहनामध्ये भरून ठेवल्याचे आढळून आले. त्यांना धान्याचा परवाना व कागदपत्रांची मागणी केली असता ते कोणत्याही प्रकारचा परवाना व कागदपत्रे सादर करण्यास असमर्थ ठरल्याने पंचासमक्ष १९ टन तांदूळ किंमत अंदाजे १,९०,०००/- रुपये, ०१ टन गहू किंमत अंदाजे ७०००/- रुपये व एक टाटा कंपनीचे वाहन क्र.MH२९BE४३८२ अंदाजे किंमत ७,००,०००/- रुपये व एक मोटारसायकल क्र.MH३७-१७५७ अंदाजे किंमत १५,०००/- रुपये असा एकूण ९,१२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा श्री.जगदीश पांडे यांच्या पथकाने पार पाडली. जीवनावश्यक वस्तूंचा गैरप्रकार करत साठेबाजी व काळाबाजार करून नागरिकांच्या सोयीसुविधांमध्ये बाधा निर्माण करू पाहणाऱ्या साठेबाजांवर वाशिम पोलीस दल लक्ष ठेवून आहे. नागरिकांनीही त्यांना आढळलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या गैरप्रकाराबाबत वाशिम जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षास (संपर्क क्र. ०७२५२-२३४८२४) किंवा संबंधित पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206