Home यवतमाळ RTO चेकपोस्ट तपासणी नाक्यावर दरमहा लाखोंची “उलाढाल”

RTO चेकपोस्ट तपासणी नाक्यावर दरमहा लाखोंची “उलाढाल”

253

खासगी पंटर नेमले ‘सबमिशन’ साठी बोली…!

यवतमाळ – दरमहा लाखो रूपयांची उलाढाल असलेल्या यवतमाळ जिल्हातील पिंपळखुटीच्या सीमा वाहन तपासणी नाक्यावर ड्युटी मिळविण्यासाठी वाहतूक निरीक्षकांकडून लाखोंची बोली लावली जात आहे. हे सबमिशन दिल्यानंतरच येथील ड्युटीची संधी वरीष्ठांकडून दिली जाते. या नाक्यावर वसुलीसाठी पाटणबोरी व पिंपळखुटीतील काही खासगी पंटर (एडीसी) कार्यरत आहेत. याशिवाय साहेबांच्या मर्जीतील दहा माणसांचीही येथे वर्दळ असते. 

पिंपळखुटी चेक पोस्टवर राज्यात येणारी वाहने आणि राज्याबाहेर जाणारी वाहने असे दोन नाके आहे. येथे स्वतंत्र वाहतूक निरीक्षकांची नेमणूक केली जाते. नागपुर व अकोला येथील एक अधिकारी, यवतमाळातून दोन, वाशिम एक आणि अमरावतीतील चार वाहतूक निरीक्षकांची आळीपाळीने ड्युटी लावली जाते. ही सायकल तोडून ड्युटी हवी असल्यास संबंधित अधिकाऱ्याला दुप्पट सबमिशन द्यावे लागते. या मार्गावरून जाणाऱ्या दहाचाकी वाहनाला ५०० रुपये, १२ ते १४ चाकी वाहनाकडून १००० रुपये, ट्रेलरकडून ५ हजार, गोवंश तस्कर वाहनाकडून १५ हजार, आणि बंद कंटेनर ज्यातून मासांची तस्करी होते त्यासाठी २५ हजार रुपये वसूल केले जातात.

अधिकाऱ्यांच्या आठ तासाच्या ड्युट्या असल्यातरी ते मनमर्जीप्रमाणे सलग तीन, तीन दिवस ड्युटी करताना दिसतात. वसुलीचा सर्व कारभार खासगी पाच लोकांकडून केला जातो. त्यासाठी त्यांंना महिन्याकाठी २५ ते ३० हजार रुपये पगार देण्यात येतो. या व्यतिरिक्त पिंपळखुटीतील रोजंदारी दंडेवाल्या मुलांना ५०० रुपये आणि एडीसी (पैसे वसूल करणाऱ्यांना) १००० रुपये रोज दिला जातो. हे सर्व खासगी कर्मचारी दिवसाकाठी हजार ते पाच हजारापर्यंतचा वैयक्तिक गल्ला जमा करतात. या व्यतिरिक्त संपूर्ण आठ तासात किमान पाच ते दहा लाख रुपये गोळा होत असल्याचे सांगण्यात येते. याचे वाटप करताना डेप्युटीला ५० हजार, सहायकाला एक लाख व प्रादेशिकला दोन लाख या प्रमाणे दिवसाकाठी वाटा दिला जातो. महिन्याकाठी येथे ५० लाखांची उलाढाल होते. यात विविध क्षेत्रातील घटकांचा वाटा ठरलेला असतो. त्यात मोठा शेअर राजकीय पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा राहात असल्याचे सांगितले जाते. हा सर्व प्रकार राजरोस सुरू आहे.

सज्जन’ अधिकाऱ्याकडून रसद

डेप्यटी आरटीओ कार्यालयातच पदोन्नती मिळालेल्या सज्जन अधिकाऱ्याने ‘रंगेहात’ पकडले जाऊ नये म्हणून रसद पुरविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच्या माध्यमातून महिन्याकाठी पाच ते सहा लाखांचा गल्ला जात असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच पिंपळखुटी चेक पोस्टवर गेल्या काही वर्षात एकदाही ‘जाळे फेकले’ गेले नाही. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्याबाहेरून रनिंग जाळ्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तोही यशस्वी झाला नाही.