
स्व. बाबुराव पराडकरांचे कार्य पत्रकारांसाठी कायम प्रेरणादायी- पायगव्हाणे

जालना – लक्ष्मण बिलोरे
दि. १६ – स्व. बाबुराव विष्णू पराडकर या मराठी माणसाने स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हिंदी पत्रकारिता एका उंचीवर नेऊन गौरवास्पद कामगिरी केली आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात पराडकर यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली असून, त्यांनी आपल्या पत्रकारितेतून सतत इंग्रजांविरुद्ध सडेतोड लिखाण करून भारतीय नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. त्यांचे कार्य सर्व पत्रकारांसाठी कायम प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ज्ञानदेव पायगव्हाणे यांनी केले आहे.
जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने येथील पत्रकार भवनात राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हिंदी वृत्तपत्र सृष्टीचे भीष्मपितामह स्व. बाबुराव विष्णू पराडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करतांना श्री.पायगव्हाणे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना श्री. पायगव्हाणे म्हणाले कि, पत्रकारिता हे सतीचे वाण आहे. समाजातील चांगल्या, वाईट कामाच्या नोंदी घेणारा पत्रकार हा जागरूक नागरिक आहे. मात्र, समाजासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत. पत्रकारांनी समाजाचे प्रश्न सोडविण्याबरोबरच आपल्या व्यक्तिगत प्रश्नाकडेदेखील लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर आगळे म्हणाले कि, मराठी पत्रकार परिषदेचे ४३वे राष्ट्रीय अधिवेशन येत्या १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड येथे होत आहे. या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रश्नावर विचारमंथन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन आगळे यांनी केले.
प्रारंभी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस नारायण माने यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर आगळे, जिल्हा उपाध्यक्ष अभयकुमार यादव, कोषाध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी, चिटणीस शेख मुसा, धनंजय देशमुख, उमेश वाघमारे, लहू गाढे, सीताराम तुपे, अंकुश गायकवाड, जावेद तांबोळी, आशिष रसाळ, जिल्हा माहिती कार्यालयाचे अनिल परदेशी, श्री. तुपसुंदर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.











































