
➡️ दिवाणी व फौजदारी न्यायाधीश ए. ए. उत्पात यांचे जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याचे आवाहन..!
( अयनुद्दीन सोलंकी )
————————–
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील प्रलंबित तसेच वादपूर्व प्रकरणात तातडीने निर्णय व्हावे, या उद्देशाने घाटंजी तालुका विधी समिती व घाटंजी न्यायालयाच्या वतीने १२ नोव्हेंबर २०२२ रोजी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय (कनिष्ठ स्तर) येथे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी सांगितले की, लोक अदालतीमध्ये दिवाणी प्रकरणाचा निपटारा झाल्यास न्यायालयाकडून संपूर्ण कोर्ट फी माफ होते. तसेच प्रकरणांमध्ये कमीत कमी दंड ठोठावला जातो म्हणून घाटंजी न्यायालयाच्या न्यायाधिकार क्षेत्रातील पक्षकारांनी मोठ्या संख्येने लोक अदालतीमध्ये उपस्थित राहून प्रकरणे निकाली काढावी, तसेच या लोक अदालतीमध्ये दिवाणी प्रकरणे, तडजोडपत्र, फौजदारी खटले, कौटुंबिक वाद प्रकरणे, धनादेशाची प्रकरणे, मोटार वाहन वाहतूक शाखेची दाखलपूर्व प्रकरणे याकरिता समेटसाठी पक्षकांनी पुढे येऊन लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी केले आहे.











































