Home यवतमाळ राष्ट्रसंताच्या स्मृतिदिनी कारेगावात प्रबोधन गावकऱ्यांना वैचारिक मेजवाणी ख्यातनाम कव्वालांचा सामना…!

राष्ट्रसंताच्या स्मृतिदिनी कारेगावात प्रबोधन गावकऱ्यांना वैचारिक मेजवाणी ख्यातनाम कव्वालांचा सामना…!

262

यवतमाळ : तालुक्यातील कारेगाव (यावली) येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५४ व्या स्मृतिदिनी यंदाही प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहाने आयोजित करण्यात आला. श्री.गुरुदेव भजनी मंडळाने याचे आयोजन केले होते.यानिमित्त यवतमाळच्या गुरुदेव युवा संघाकडून गावातील विधवा महिलांना साडीचोळीचे वाटप करण्यात आले.


कारेगाव यावली या गावाला तुकडोजी महाराजांच्या विचारांची जोड आहे. ग्रामप्रबोधनाची चळवळ येथे प्रभावीपणे दिसून येते. गावामध्ये सक्रिय असलेल्या श्री.गुरुदेव भजनी मंडळाने शनिवारच्या सायंकाळी गावातील मुख्य चौकात ग्राम प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. गावकऱ्यांच्या मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर व्हावा,भोंदूगिरीच्या मागे कुठलीही अलौकिक शक्ती नसून यामागे भोंदूबाबा हे कश्याप्रकारे विज्ञानाचा वापर करून जादूचे प्रयोग करतात याचे सखोल विश्लेषण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा समन्वयक रुपेश वानखेडे यांनी केले.परंतु,प्रारंभीच्या या कार्यक्रमाला वयस्क ग्रामस्थांनी जरी पाठ फिरविली परंतु, बालकांची यास लक्षणीय उपस्थिती होती.त्यानंतर उपस्थित कव्वाल मानकर बाबू (यवतमाळ),वंदना खोब्रागडे (वाशीम), चंदू बादशाह (नेर) , संगीता हस्ते (पांढरकवडा ) व दिनेश गायकवाड ( दारव्हा) यांनी आपल्या गीतांच्या सादरीकरणातून कार्यक्रमात रंग भरला.याप्रसंगी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी आपले विचार मांडून गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे अभिवाचन दिले. आयोजनासाठी गुरुदेव भजनी मंडळाचे गणेश चांदेकर महाराज व त्यांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते किशोर नरांजे, गुरुदेव युवा संघाचे प्रफुल मानकर, राजू महाराज विरदंडे, भाऊराव वासनिक,सुहास कांबळे आदी उपस्थित होते.

तुझ्या चेहऱ्यावरची लाली लाली….
कव्वाल मानकर बाबू यांनी आपल्या तुझ्या चेहऱ्यावरची लाली लाली… या वंदन गीतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे समाजावर असलेल्या उपकारांची उपस्थितांना जाणीव करून दिली. त्यापाठोपाठ याचे प्रत्युत्तर कव्वाल वंदना खोब्रागडे यांनी आपल्या खमक्या शैलीतून दिले.

महिलांनी आपल्या समस्या मांडाव्या – गुरुदेव आयोजित कार्यक्रमात गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी आपले विचार मांडताना येथील समस्याग्रस्त महिलांच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पुढे त्यांनी येथील महिलांनी आपल्या समस्या गुरुदेव युवा संघाकडे मांडण्याचे आवाहन केले.